भायखळा ई प्रभागात पूर्वी एकूण ०७ प्रभाग होते, परंतु नव्या प्रभाग रचनेत या विभागात एक प्रभाग वाढला आहे. त्यामुळे या प्रभागाची एकूण संख्या ०८ एवढी झाली आहे. विशेष म्हणजे या विभागात सध्या चर्चेत असलेले माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, समाजवादी पक्षाचे आमदार व महापालिकेचे माजी गटनेते रईस शेख व अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी असे नगरसेवक या विभागाचे प्रतिनिधीत्व करत होते. भाखळा, चिंचपोकळी आणि नागपाडा, माझगावचा भाग असलेल्या या ई विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये मागील सन २०१७ च्या निवडणुकीतील दोन प्रभाग महिला आरक्षित, तीन खुला प्रवर्ग, एक एस.सी.महिला आणि एक ओबीसी असे आरक्षण पडले होते, परंतु सन २०२२ च्या निवडणुकीकरता काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत तीन प्रभाग महिला आरक्षित, तीन प्रवर्ग खुले, दोन प्रभाग अनुसूचित जातीकरता आरक्षित झाले आहेत.
या मतदार संघात २२१ नवीन प्रभाग
या मतदार संघात २२१ हा नवीन प्रभाग बनला आहे, ज्यात सपाचे रईस शेख (२५ टक्के), काँग्रेसच्या निकिता निकम (३५ टक्के), काँग्रेसच्या सोनम जामसूतकर (२० टक्के) आणि काँग्रेसचे जावेद जुनेजा (१० ते १५ टक्के) यांच्या प्रभागाचा समावेश आहे. हा नवीन प्रभाग आता अनुसूचित जातीकरता खुला झाला असून याठिकाणी शिवसेना पक्ष कुणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. यशवंत जाधव यांचा जुना प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांच्यासाठी हा प्रभाग पर्याय असू शकेल. परंतु काँग्रेसमधून आलेले मनोज जामसूतकर हेही या प्रभागातून लढण्यास पात्र असल्याने कोणाच्या पारड्यात हा प्रभाग पडतो याकडेही लक्ष असणार आहे.
भविष्यात यशवंत जाधव यांना तिकीट नाकारले जाईल, अशाप्रकारची एकप्रकारे हवा केली जात असली तरी सध्याच्या स्थितीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला पक्ष तिकीट नाकारले जावू शकत नाही. त्यामुळे पक्ष यशवंत जाधव यांच्याबाजुने उभे राहिल्यास त्यांच्यासाठी हा नवीन प्रभाग असू शकतो. विशेष म्हणजे मनोज जामसूतकर यांना जर या नवीन प्रभाग क्रमांक २२१ मधून उमेदवारी दिल्यास त्यांना जुना प्रभाग क्रमांक २१०, जो आता २१८ झाला आहे, त्यावरील दावेदारी सोडावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जामसूतकर हे आपल्या पत्नी सोनम यांनाच निवडणूक रिंगणात उतरवू शकतात, अशी शक्यता आहे.
प्रभाग खुला झाल्याने पुन्हा सेफ झोन
गीता गवळी यांचा प्रभाग खुला झाल्याने त्या पुन्हा सेफ झोनमध्ये आल्या आहेत, तर आमदार बनलेल्या रईस शेख यांचा नवीन प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांना आपल्या प्रभागात कोणत्याही महिलेला उभे केल्यास त्यांना निवडून आणण्यासाठी मोठी ताकद लावावी लागेल. कारण त्यांचा २५ टक्के प्रभाग कमी झाला आहे. तर काँग्रेसचे जावेद जुनेजा यांचा प्रभाग खुला झाल्याने तेही सेफ झोनमध्येच आहे. शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांचाही प्रभाग खुला झाला आहे. विशेष म्हणजे या विभागात भाजपची एकमेव नगरसेविका होती, तो प्रभाग आता नव्या प्रभाग रचनेत अनुसूचित जातीकरता आरक्षित झाला आहे. या प्रभागात आता सुरेखा लोखंडे किंवा रोहिदास लोखंडे यांना लढता येणार नाही. त्यामुळे भाजपला नवीन उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार असून लोखंडे यांनाही बाजुच्या प्रभागात जावे लागेल.
या निवडणुकीत आपल्या मुलाला महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरवण्यास इच्छुक असणाऱ्या यशवंत जाधव यांच्यासाठी लोखंडे यांचा हा प्रभाग अनुकूल असा आहे. या प्रभागात अनुसूचित जातीचे आरक्षण पडल्याने यशवंत जाधव यांचा मुलगा आणि युवा सेनेचे पदाधिकारी तसेच सिनेट सदस्य निखिल यांना या प्रभागातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यामुळे यशवंत जाधव हे आपल्या मुलासाठी हा प्रभाग मिळवण्यास यशस्वी होतात का हेही लवकरच पहायला मिळेल.
उमेदवारी मिळवण्याचे मोठे आव्हान
काँग्रेसच्या नगरसेविका असलेल्या सोनम जामसूतकर व त्यांचे पती माजी नगरसेवक मनोज जामसूतकर हे शिवसेनेत आल्याने शिवसेना या विभागात अधिक मजबूत झाली आहे. त्यातच सोनम जामसूतकर यांचा प्रभागात पुन्हा महिला आरक्षित झाल्याने मनोज जामसूतकर यांची आपल्या प्रभागात पुन्हा निवडणुकीला उभे राहण्याची संधी गेली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी नगरसेवक सुर्यकांत पाटील यांनाही उमेदवारी द्यावी लागणार असल्याने पक्षासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे एका कुटुंबाला एक पेक्षा उमेदवारी देण्याची शक्यता नसल्याने यासर्वांसमोर उमेदवारी मिळवण्याचेच मोठे आव्हान आहे.
- प्रभाग २०७, महिला, (सुरेखा लोखंडे भाजप), नवीन प्रभाग २१५, (अनुसूचित जाती)
- प्रभाग २०८, खुला, (रमाकांत रहाटे,शिवसेना), नवीन प्रभाग २१६, (खुला प्रवर्ग)
- प्रभाग २०९, खुला, (यशवंत जाधव,शिवसेना), नवीन प्रभाग २१७, (महिला आरक्षित)
- प्रभाग २१०, अनुसूचित महिला, (सोनम जामसूतकर,काँग्रेस), नवीन प्रभाग २१८, (महिला)
- प्रभाग २११, ओबीसी, (रईस शेख,सपा), नवीन प्रभाग २२०, (महिला आरक्षित)
- प्रभाग २१२, महिला, (गीता गवळी,अभासे), नवीन प्रभाग २१९, (खुला प्रवर्ग)
- नवीन प्रभागाची रचना, (जुने वॉर्ड २१०/२११/२२३)प्रभाग क्रमांक २२१, (अनुसूचित जाती)
- प्रभाग २१३, खुला (जावेद जुनेजा, काँग्रेस), नवीन प्रभाग २१५, (अनुसूचित जाती)
सन २०१७ च्या निवडणुकीतील आरक्षित प्रभाग :
दोन महिला प्रवर्ग, तीन खुला प्रवर्ग, एक एस.सी.महिला, एक ओबीसी : एकूण प्रभाग संख्या ०७
सन २०२२ च्या निवडणुकीतील आरक्षित प्रभाग :
तीनमहिला प्रवर्ग, तीन खुला प्रवर्ग, दोन एस.सी : एकूण प्रभाग संख्या ०८