राज्यातील राज्यसभा निवडणूक चुरशीची झाल्यामुळे सर्वच पक्ष एकेका मतासाठी झगडत आहेत. असे असताना आता महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यात येणार नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडीला निवडणुकीत मोठा फटका बसणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
न्यायालयाने परवानगी नाकारली
राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांना केवळ विधानसभेतील आमदार मतदान करू शकतात. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि आमदार अनिल देशमुख हे दोघेही सध्या तुरुंगात असल्यामुळे त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून न्यायालयात धाव घेण्यात आली होती. यावर गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मत देण्याची परवानगी नसल्याचा निर्णय न्यायालयाने यावेळी दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची ही दोन मते कमी झाल्यामुळे आता मविआच्या अडचणीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ईडीचा युक्तिवाद
बुधवारी याबाबत न्यायालयात ईडीकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो, त्यामुळे देशमुख आणि मलिकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी भूमिका ईडीने न्यायालयासमोर मांडली. त्यानंतर बुधवारी न्यायालयाकडून हा निकाल राखून ठेवण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community