राज्यात बुधवारपासून मान्सूनपूर्व पावसाला दक्षिण कोकण, कोल्हापूरात पुन्हा सुरुवात झालेली असताना कारवारलाच बरेच दिवस अडकलेल्या पावसाला पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार झाल्याची माहिती गुरूवारी भारतीय वेधशाळेने दिली. शनिवारपर्यंत नैऋत्य मोसमी वारे गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रापर्यंत पोहोचतील, असा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी दिली. त्यानंतरही सोमवारपर्यंत मान्सूनची राज्यात घोडदौड सुरुच राहील, अशी सुखदवार्ताही त्यांनी दिली.
( हेही वाचा : MSRTC : एसटी कर्मचारी कोरोना प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित!)
नैऋत्य मोसमी वारे कर्नाटक, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागरातील बराचशा भागांत येत्या दोन दिवसांत पोहोचतील, अशी आशाही वेधशाळेला आहे. राज्यात बुधवारपासून जवळपास सर्वच भागांत हलका पूर्वमोसमी पाऊस पडला. मेघगर्जनेसह तसेच विजेच्या कडकडाटांसह दक्षिण कोकणात पावसाचे आगमन झाले. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही ब-याच ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हलक्या सरींसह प्रवेश केला. ऐन जून महिन्यात पावसाच्या गैरहजेरीने राज्यभरात जास्त तापमानाचा अनुभव येत होता. किनारपट्टीतही घामाच्या धारांनी त्रासलेल्या लोकांना पावसाच्या आगमनाची आतुरता लागली होती.
हवामानाचा अंदाज –
- कोकणात आणि मध्यमहाराष्ट्रात १३ जूनपर्यंत पूर्वमोसमी पावसाचा जोर राहील
- मराठवाड्यात रविवानंतर पूर्वमोसमी पावसाचा जोर वाढेल
- उष्णतेच्या लाटा अनुभवणा-या विदर्भातही आता पूर्वमोसमी पावसाच्या सरी सक्रीय होत आहेत. विदर्भात सोमवारपर्यंत ब-याच ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर ताशी वेगाने वार वाहत वावटळीसह पूर्वमोसमी पावसाचा जोर दिसून येईल.