मुंबईमधील बहुतांश शाळेमधील विद्यार्थ्यांना डबेवाले कामगार गेली कित्येक वर्ष जेवणाचे डबे पोहचवत आहेत. परंतु अलिकडच्या काळात शाळा व्यवस्थापनेने शिक्षणाचा व्यवसाय मांडला आहे की काय अशी शंका येते आहे असा सवाल डबेवाला असोसिएशनने उपस्थित केला आहे. कारण कोरोना काळापासून डबेवाल्यांना कॉन्हेंट शाळांमध्ये प्रवेशबंद करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी कपडे,वह्या, पुस्तके, शालेय साहित्य शाळेतून घ्यावेत असे शाळा व्यवस्थापनाकडून सांगितले जाते. मध्यंतरी अशाचप्रकारे शाळांनी फतवे काढून शाळेत येणाऱ्या डबेवाल्या कामगारांना सुरक्षेच्या कारणावरून प्रवेश बंद केला आणि शाळेत जर विद्यार्थ्यांना काही खायचे असेल तर त्यांनी शाळेच्या कॅन्टिंग मध्ये जाऊन खावे असे सांगितले तुमचा नियम आहे तो आम्हाला मान्य आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना घरचा डबा खायचा असेल तर त्यांना तरी आम्हाला डबे पोहोचवू द्या अशी मागणी करत मुंबई डबेवाला असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
( हेही वाचा : दुसरे महायुद्ध, मुंबईचा डबेवाला ते ऑनलाइन ऑर्डर; Food वितरण प्रणालीचा रंजक इतिहास)
मुंबई डबेवाला असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गेली दोन वर्ष करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या शाळेत डबे पोहचवणारा डबेवाला कामगार बेरोजगार होता आता जून महिन्यात शाळा चालू होऊ लागल्या आहेत. शाळेत साधारणत: हजार, दोन हजार विद्यार्थी असतात. त्यांचे पालक त्यांना शाळेत सोडण्यास येतात त्यांचा कोणाशी संपर्क येत नाही का ? मग डबेवाला कामगारांना शाळेच्या परिसरामध्ये येण्यास मनाई का ? असा सवाल डबेवाला संघटनांनी उपस्थित केला आहे. शाळेच्या आवारात शाळा प्रशासन सांगेल तेथे आम्ही डबे ठेवतो आणि त्यानंतर विद्यार्थी ते डबे घेऊन जातात व जेवल्यावर तेथे परत रिकामा डबा आणून ठेवतात. याबाबत शासनाने शाळा व्यवस्थापन आणि डबेवाले कामगार यांची बैठक घेऊन यातून मार्ग काढला पाहिजे. नाहीतर डबेवाल्या कामगारांचा रोजगार बुडेल असे मुंबई डबेवाला असोसिएशनने यापत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community