भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यामुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसतेय. मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने संजय राऊत यांना समन्स जारी केले आहे. यानुसार, संजय राऊतांना 4 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण
किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्याविरोधात सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यामुळे याप्रकरणी किरीट दाम्पत्याने अवमान झाला असल्याची तक्रार दाखल केली होती.
… म्हणून बजावलं सोमय्यांना समन्स
सुमारे 100 कोटींचा हा घोटाळा आहे. मग घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत? पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे, असे विधान राऊत यांनी केले होते. हे सर्व प्रतिमा मलिन करणारे आहे आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे असून यामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी झाली आहे, असा दावा करत मेधा सोमय्यांनी राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने राऊतांना समन्स बजावत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
(हेही वाचा – राज्यसभा निवडणुकीपूर्वीच MIM ने स्पष्ट केली भूमिका, ‘मविआ’लाच मत देणार )
दरम्यान, मविआकडूनही सोमय्यांनी केलेल्या कथित घोटाळ्यांची माहिती बाहरे काढण्यात आली. यानुसार, मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली आहेत. त्यामधील 16 शौचालये बांधण्याचे कंत्राट हे मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. या कामात बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता, असे सांगितले जात आहे. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता.