‘कांदे’ शिवसेनेला रडवणार? निवडणूक आयोगाने मत बाद केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का

131

राज्यातील सहा जागांसाठी होणा-या राज्यसभा निवडणुकीच्या निकालाचा तिढा आता अखेर सुटला आहे. भाजपने महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांवर घेतलेल्या आक्षेपामुळे या मतमोजणीला विलंब झाला होता. पण आता याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय देण्यात आला आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत अवैध ठरवत केंद्रीय निवडणूक आयोगाने आता मतमोजणीला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या अडचणींत वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय

विधान भवनातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या संपूर्ण मतदान प्रक्रियेची तपासणी करण्यात आली व त्यानंतर आयोगाने शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत अवैध ठरवलं आहे. त्यामुळे आता एकूण 284 आमदारांची मतं ग्राह्य धरुन त्यानुसार मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पण शिवसेनेच्या दुस-या उमेदवारासाठी प्रत्येक मत हे निर्णायक असल्यामुळे शिवसेनेला या निवडणुकीत अडचणीचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

का झाले कांदेंचे मत बाद?

  • मतदान करताना मतदारानं मतपत्रिकेची घडी घालणं आवश्यक असतानाही कांदेंनी मतपत्रिकेची घडी घातली नाही आणि त्यामुळे त्यांची मतपत्रिका सर्वांना दिसली
  • मतदान कक्षाच्या बाहेरुन कांदे यांनी आपल्या पक्षाच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवली
  • त्यानंतर निवडणूक अधिका-यांनी त्यांना मतदानासाठी निवडणूक कक्षात जाण्यास सांगितलं
  • मतदानावेळी सुहास कांदे यांनी काही जणांशी संवाद साधला

यांची मते वैध

भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि शिवसेना आमदार यांच्या मतांबाबत आक्षेप नोंदवण्यात आला होता. तर महाविकास आघाडीने भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांची मतं बाद करण्याची मागणी केली होती. पण आता यापैकी सुहास कांदे यांचं मत अवैध असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.

अर्ध्या तासात मतमोजणी सुरू होणार

त्यामुळे आता या सहा जागांसाठी अवघ्या मतमोजणीला सुरुवात होणार असून, त्यानंतर काही वेळातच राज्यसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता या हाय व्होल्टेज निकालाची सर्वांनाच प्रतिक्षआ आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.