महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायमस्वरूपी कोरल्या गेलेल्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल अखेर लागला. या नाट्यमय आणि थरारक निवडणुकीचा निकाल हाती आला असून, यामध्ये महाविकास आघाडीचे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल,इम्रान प्रतापगढी यांनी बाजी मारली आहे. तर भाजपच्या पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक या तिन्ही उमेदवारांनी ही लढाई जिंकली आहे.
तर शिवसेनेच्या संजय पवार यांचा दारुण पराभव झाल्यामुळे मविआ आणि शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या या दोन्ही मल्लांमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढाईत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी मैदान मारलं असून, शिवसेनेच्या संजय पवार यांना त्यांनी असमान दाखवलं आहे. पण या संपूर्ण निवडणुकीचा घटनाक्रम नाट्यमय, थरारक आणि रोमहर्षक ठरला.
असा होता घटनाक्रम
- शुक्रवार 10 जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात
- भाजपचे पुण्यातील आमदार लक्ष्मण जगताप प्रदीर्घ आजारी असूनही त्यांना एअर लिफ्ट करून मतदानासाठी विधानभवनात आणले
- भाजपच्या दुसऱ्या आमदार मुक्ता टिळक आजारी असूनही त्यांना मतदानासाठी रुग्णवाहिकेतून विधानभवनात आणले
- समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी माध्यमांना महाविकास आघाडीला मते दिल्याची माहिती दिली
- एमआयएमनेही महाविकास आघाडीला मते दिल्याची माहिती दिली
- नवाब मलिकांची मतदानासाठी जामीन देण्याची याचिका ऐकण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- भाजपचे पराग अळवणी आणि अतुल सावे यांनी सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांनी मतदानाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला
- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची विधानसभेत तातडीची बैठक आणि मतांचा कोटा वाढवण्याचा निर्णय
- राष्ट्रवादीने ४१ वरून ४४ मतांचा कोटा वाढवला, काँग्रेसनेही कोटा ४३ केला
- शिवसेनेचे उमेदवार संजय पवार अडचणीत आल्याने मुख्यमंत्री ठाकरे राष्ट्रवादी-काँग्रेस नाराज
- मविआकडून भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणांच्या मतदानावर आक्षेप
- भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव, शिष्टमंडळ आयोगाला भेटले
- सायंकाळी ५ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीची प्रक्रिया थांबवली
- निवडणूक आयोगाकडून वैध मतांबाबत तपास करण्यात येत असल्याने साडे आठ तास मतमोजणीला स्थगिती
- अखेर शिवसेना आमदार सुहासे कांदे यांचे मत बाद करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
- त्यानंतर 284 वैध मतांच्या मोजणीनंतर अखेर निकाल हाती आला.