शिवसेनेचा खरा मित्र कोण? राज्यसभा निवडणुकीनंतर उपस्थित होतोय प्रश्न

134

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत आपण ज्यांच्या विरोधात लढत होतो, त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन राज्याचा विकास करण्यासाठी मदत केली, असा दावा केला होता.परंतु राज्यसभेच्या निवडणुकीत ज्या मित्रांनी सहाव्या जागेवर शिवसेनेला उमेदवार उभा करण्यास सांगून पूर्ण मदत करण्याची तयारी दर्शवली,त्याच उमेदवाराचा पराभव झाला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांचा कोटा आयत्यावेळी वाढवून, शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला असे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेचा या नवीन मित्रांवर तरी विश्वास आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(हेही वाचाः …तरीही संजय राऊत काठावर पास)

पवारांचा पराभव

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल आणि प्रतापगढी हे विजयी झाले, तर भाजपचे पियुष पटेल, अनिल बोंडे यांचा विजय निश्चितच होता, परंतु सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात खरी चुरस होती. मतांची आकडेवारी पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार हे विजयी होतील,असा दावा सरकार करत होते. परंतु संजय राऊत यांना महाविकास आघाडीच्या अन्य दोन उमेदवारांच्या तुलनेत कमी मते पडली. राऊत हे विजयी झाले असले तरी संजय पवार यांचा दारुण पराभव झाला.

अचानक कोटा वाढवला

शिवसेनेच्या या चौथ्या उमेदवाराच्या विजयाची रणनीती ठरलेली असतानाच, अचानकपणे निवडणुकीच्या अवघ्या काही तास आधी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारासाठी मतांचा कोटा बदलल्याने शिवसेनेच्या आमदारांची रणनीती चुकल्याचे बोलले जात आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात ४२ मतांचा कोटा ठरलेला असताना, शरद पवार यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहाखातर त्यांच्यासाठी ४४ मतांचा कोटा केला. परंतु शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर हा कोटा कमी केला.

(हेही वाचाः पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम होईल, फडणवीसांच्या विधानाने खळबळ)

मविआतील गोटातूनच घात झाला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बदललेल्या भूमिकेमुळे शिवसेनेची दुसरी जागा धोक्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर मतांचा कोटा कमी करण्यात आला, तरी शिवसेनेने आखलेल्या रणनीतीमध्ये यामुळे बराच बदल झाला, याचा फटका शिवसेनेला बसल्याचे बोलले जात आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्होटिंग पॅटर्नवर शिवसेनेच्या पोलिंग एजंटचे बारीक लक्ष होते, तरीही त्यांचा घात झाला. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षाकडूनच मोठा घात झाल्याचे शिवसेनेच्या गोटातच बोलले जात आहे.

मित्र कोण आणि हाडवैरी कोण?

औरंगाबाद येथील सभेमध्ये बोलताना उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळणे तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत इतके दिवस, ज्यांच्या विरोधात आपण लढत होतो, त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन राज्याचा विकास करण्यासाठी मदत केली आणि आज मित्र हाडवैरी बनला आणि शत्रू मित्र बनले आहेत,असे सांगितले. परंतु राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे खरे मित्र कोण आणि हाडवैरी कोण असा सवाल उपस्थित होऊ लागला. भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनीही प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे विधान केले.

(हेही वाचाः नशीब… राऊत काठावर वाचले, भुजबळांनीच दिली कबुली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.