समुद्राच्या तळाशी जाऊन रंगीबेरंगी, कलरफूल तसेच छोटे आणि मोठे मासे, विविध जातीचे जलचर प्राणी पाहता आले तर असा अनुभव आता मुंबईकरांना प्रत्यक्षात घेता येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात पर्यटक, निसर्गप्रेमी आणि खास करून लहान मुले आणि विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता आता महानगरपालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयाची उभारणी करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंबईकर नागरिकांसह येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांना असा सुखद आणि अनोखा अनुभव घेता येईल.
असे असणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालय
राणीबागेत घुमटाकार प्रवेश मार्ग आणि बोगद्यासारख्या गोलाकार स्वरुपात मत्स्यालय साकारले जाणार आहे. येथे दोन बोगदे असतील. त्यातून जाताना जवळपास ५० प्रकारचे विविध जातींचे मासे, जलचर प्राणी न्याहाळता येणार आहेत. मत्स्यालयात फिरताना चौकोनी आकाराचे ४ गोल आकाराचे ५ आणि अर्ध गोलाकार २ अशा एकूण १९ आधुनिक स्वरुपाच्या मत्स्य कुंडामध्ये रंगबिरंगी स्वरुपाचे मासे देखील पाहता येतील.
पर्यटकांसाठी ही पर्वणी
भविष्यात हे मत्स्यालय पर्यटकांसाठी निश्चितच मोठे आकर्षण ठरेल, तसेच पर्यटकांची संख्या आणखी वाढेल असा महापालिकेने दावा केला आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे आधुनिकीकरण पूर्ण होऊन त्यात आकर्षणाची भर पडते आहे. प्राणिसंग्रहालयात विविध वैशिष्ट्ये समाविष्ट केली जात आहेत. पेंग्विन दाखल झाल्यानंतर पर्यटकांची झुंबड उडते आहे. नव्याने दाखल झालेले वन्य पशू-पक्षी, प्राणी याठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरत आहे.
(हेही वाचा – पुलवामामध्ये लष्कराला मोठं यश, लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा )
ही आहेत वैशिष्ट्ये
- पेंग्विन प्रदर्शनीजवळच सहाशे चौरस मीटर जागेवर हे मत्स्यालय उभारण्यात येईल.
- दोन बोगदे उभारले जातील. एक बोगदा १२ ते १३ मीटर लांबीचा असेल
- दुसरा बोगदा १७ ते १८ मीटर लांबीचा असेल. याशिवाय ४ ते ५ सिलेंडीकल टँक असतील.
- ३६ मीटर अंतराच्या भागात विविध मासे आणि समुद्रातील जल परिस्थिती पाहता येईल.
- दोन गोलाकार भागांना जोडताना मध्ये एक घुमटाकार प्रवेश मार्ग असेल, तेथेही समुद्री जीवन न्याहाळता येईल.