महाराष्ट्रात उद्याच्या सत्तेचा उगवता सूर्य हा भाजपच असेल- प्रवीण दरेकर

151

विद्यमान महाविकास आघाडी सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. हे राज्यसभेच्या निवडणूकीतून नुकतेच सिद्ध झाले आहे. लोकांचा विश्वास हा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. विरोधी पक्ष असूनही प्रत्येकवेळी जनतेला न्याय मिळवून देण्याचे प्रामाणिक काम भाजपने केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उद्याच्या सत्तेचा उगवता सूर्य हा भाजपच असेल. महाराष्ट्राचे सत्ता केंद्र हा आता विरोधी पक्ष झाला आहे असे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर म्हणाले.

शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने रविवारी विविध क्षेत्रात काम करणार-या मान्यवरांचा पुरस्कार विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्य हस्ते देऊन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सन्मान करण्यात आला. त्यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दरेकर म्हणाले की, १७ व्या शतकामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी खूप मोठे काम केले आहे. पुरुषाच्या बरोबरीने महिलांचेही नाव ७/१२ वर लागले पाहिजे ही भुमिका त्यावेळी त्यांनी घेतली. अनेक मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी त्यांनी निधी दिला. धनगर समाजातील काम करणार-या व्यक्तीच्या पाठीमागे अनेक ठिकाणी निधी देण्याचे कामही त्यावेळी अहिल्याबाई होळकर यांनी केले आहे.

अहिल्यादेवी या लढवय्या होत्या

दरेकर पुढे म्हणाले की, अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचा पाढा वाचायला गेला, तर तास न तास कमी पडतील. अहिल्यादेवी यांचे कर्तृत्व सर्वव्यापी, सर्वस्पर्शी होते. त्यांच्याकडे पाहत असताना एक कुशल प्रशासक म्हणून पाहिले जाते. ज्या काळात अत्याधुनिक साधनसामग्री, आधुनिक नेटवर्क उपलब्ध नसताना वेगवेगळ्या विषयांचे नियोजन कसे करावे, राज्यकारभार कसा चालवावा याचा त्या आदर्श मानल्या जातात, असेही त्यांनी सांगितले. अहिल्यादेवी या पराक्रमी, लढवय्या होत्या. त्यांचे पराक्रम नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. त्याही वेळेला त्यांचा दृष्टिकोन पाण्याच्या संदर्भात दूरदृष्टीचा होता. म्हणून पाण्यासाठी विहिरी काढणे, साठवणूक करणे, साठवण तलाव करणे, यावर त्या आग्रही असायच्या. विधवांच्या विषयांमध्ये विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीमध्ये पहिला वाटा मिळाला पाहिजे हे सांगणाऱ्या अहिल्यादेवी होळकर होत्या. मुलांना दत्तक घेण्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. अन्नछत्र तयार करणे, धर्मशाळा बांधणे अशा वेगवेगळ्या घटकांना ज्याची गरज असेल, त्याची त्यांनी उभारणी केली. त्यांचे धर्माच्या बाबतीत कामही सर्वश्रुत आहे असेही त्यांनी सांगितले.

( हेही वाचा: आता वर्षभर पराभवाची कारणे सांगत बोटे मोडत बसा! भाजपचा राऊतांना टोला )

तुमच्यावर अन्याय होणार नाही 

धनगर समाजाला आर्थिक पाठबळ देताना सरकारच्या वित्त विभागाने हात आखडता घेता कामा नये. २८ एप्रिलला वेगवेगळ्या महामंडळाना आपण निधी दिला मग अहिल्यादेवी महामंडळाला एक कवडी देता आली नाही. उन्हे, वारा, पावसात आमचा धनगर समाज काम करतो त्याला ४००-५०० कोटी रुपये का देऊ शकत नाही? बिल्डरच्या सबसिडीसाठी हजारो कोटी रुपये देतो त्यातला एक चतुर्थांश रूपये दिले तरी पुरेसे आहे. दारूसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देण्यात येतात, त्या कशासाठी देतो, त्या बंद करा, त्यापेक्षा जे वंचित आहेत, त्यांना थोडे आर्थिक पाठबळ देण्याची मागणी दरेकर यांनी यावेळी केले. मेटे यांनी मराठा समाजाचं काम करत असताना विधीमंडळात अनेकवेळा बहुजन समाजाचे अनेक प्रश्न उचलून धरले आहेत. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी दिला होता, असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले. लोकं उगवत्या सुर्याला नमस्कार करतात. इतरांनी कोणी एखाद्या विद्यमान मंत्र्याला या कार्यक्रमाला बोलावलं असतं मात्र तुम्ही मला विरोधी पक्षनेता म्हणून बोलावलं आहे. त्यामुळे तुमचे काम दखलपात्र असताना देवेंद्र फडणवीसही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाहीत, असा विश्वास दरेकर यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.