राज्य परिवहन महामंडळातर्फे 2016-17 मध्ये कोकण विभागासाठी चालक-वाहक भरती घेण्यात आली होती. त्यात अनेक उमेदवार उत्तीर्ण झाले होते. मात्र, पाच वर्षे उलटूनही महामंडळाकडून उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीवर रुजू करुन घेण्यात आले नाही. मुंबईला महामंडळाच्या अधिका-यांकडे फे-या मारुन हे उमेदवार थकले तरीही अद्याप त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
परिवहन मंडळातर्फे घेण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील जळगाव शहरासह चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, जामनेर भागातील तरुण चालक-मालक परीक्षेच्या सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
( हेही वाचा: सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी गुजरातमधून शार्प शूटर संतोष जाधवला बेड्या )
…तर मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी करणार
- सरकारने आतापर्यंत आमचा खूप अंत पाहिला आहे. पाच वर्षांत आम्हाला नोकरीची नियुक्तीपत्रे दिली नाहीत, याचा अर्थ सरकारला आम्हाला नोकरीवर घ्यायचे नसेल.
- नियमाप्रमाणे आम्ही भरती प्रक्रिया उत्तीर्ण झालो असताना, सरकार नोकरी देत नसेल, तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी करणार असल्याचेही संजय कोळी, गजानन गरुड, योगेश पगार, भरत जाधव, संदीप पाटील, लहू पाटील, उमाकांत राजपूत, अनिल पाटील, समाधान कोळी, लक्ष्मीकांत सूर्यवंशी, किरण राजपूत यांनी सांगितले.