पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी, १३ जून रोजी मुंबईत राजभवन येथील क्रांतिकारकांची माहिती देणाऱ्या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मागील अनेक वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट टाळली आहे. त्यामुळे राजभवन येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उपस्थित राहणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. नुकतेच राज्यसभेची निवडणूक झाली आहे. त्यामध्ये दिल्लीमधून पाठबळ मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा पराभव करून भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आणला. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपा महाविकास आघाडीला पुन्हा जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. अशा प्रकारे सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेले असताना दिल्लीविषयी नाराज असलेले मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटणार का, हे पहावे लागणार आहे.
मुंबईत केवळ काही मिनिटांसाठी झालेली भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, १४ जून रोजी एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहूमध्ये संत तुकाराम महाराजयांच्या मूर्तीचे अन् शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. याआधी भारतरत्न लता मंगेशकर यांची निधन झाले होते, तेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे हे काही मिनिटासाठी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे भेटले होते. मागील दोन वर्षांतील ही भेट वगळता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटण्याचे अनेकदा टाळले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरु झाला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्याप्रती नाराज आहेत.
कोविड बैठकीत गैरहजर!
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात काहूर माजवले होते, मृत्यूचे आकांडतांडव सुरु होते. त्यानंतर तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे अशा वेळी केंद्र आणि राज्यात समन्वय असणे नितांत गरजेचे होते. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेतली, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहिले. त्यावेळी शारीरिक आजाराचे कारण दिले, मात्र त्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्री दुसऱ्याच दिवशी मुंबई महापालिकेच्या लहानशा अॅपच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते.
विमानतळावर गेलेच नाही!
पंतप्रधान एखाद्या राज्यात येतात, तेव्हा विमानतळावर संबंधित राज्याचा मुख्यमंत्री उपस्थित असतो, तसा राजशिष्टाचार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले, तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे यांनी विमानतळावर जाणे टाळले.
(हेही वाचा घोटाळेबाज काँग्रेस; ईडीच्या चौकशीला जातानाही दाखवला सावरकरद्वेष! वीर सावरकरप्रेमींकडून व्यक्त होतोय निषेध )
मेट्रोच्या उदघाटनाला अनुपस्थित!
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होत असल्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले, म्हणून ते कार्यक्रमाला गेले नाही, अशी चर्चा त्यावेळी सुरु झाली.
लता मंगेशकर पुरस्कार वितरणाला दांडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २४ एप्रिल २०२२ रोजी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते, त्या कार्यक्रमाला न जाता मुख्यमंत्री ठाकरे सह कुटूंब राणा दाम्पत्याला विरोध करणाऱ्या ९२ वर्षीय वृद्ध महिला शिवसैनिकाला भेटण्यासाठी परळ येथे गेले.
Join Our WhatsApp Community