दिलासा! देशातील बालमृत्यूंचे प्रमाण लक्षणीय घटले!

162

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ. भारती पवार यांनी मणिपूरचे आरोग्य मंत्री डॉ. सपम रंजन सिंह यांच्या उपस्थितीत तीव्र अतिसार नियंत्रण पंधरवडा (आयडीसीएफ)-2022 चा शुभारंभ केला. हा कार्यक्रम 27 जून पर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवण्यात येणार आहे. बालपणातील अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणणे हे आयडीसीएफचे ध्येय असले तरी देशात बालमृत्यूंच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे समोर आले आहे.

बालकांच्या मृत्यूमागे हे एक मोठे कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या उल्लेखनीय प्रयत्नांमुळे, नमुना नोंदणी प्रणालीच्या ताज्या अहवालानुसार (SRS-2019) देशातल्या बालमृत्यूंचे प्रमाण 2014 पासून लक्षणीयरीत्या घटले आहे, हा दर 2014 मधील प्रति 1000 बालकांमागे 45 वरून 2019 मध्ये प्रति 1000 बालकांमागे 35 इतका कमी झाला आहे. मात्र अजूनही पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूमागे अतिसार संबंधित रोग हे एक मोठे कारण आहे, असेही राज्यमंत्री पवार यांनी सांगितले.  “डिहायड्रेशन हे मुलांमध्ये अतिसाराचे सर्वात मोठे कारण आहे आणि इतर कारणांमध्ये स्तनपान करणाऱ्या मातेच्या आहारातील बदलामुळे बाळाच्या आहारातील बदल हे कारण होय. याशिवाय स्तनदा मातेला किंवा बाळाला प्रतिजैविकांचे सेवन करावे लागल्यास तसेच कोणत्याही प्रकारचे जिवाणू किंवा परजीवी संसर्ग हे अतिसाराचे कारण असू शकते,असे डॉ पवार यांनी अधोरेखित केले.

काय म्हणाल्या केंद्रीय आरोग्यमंत्री?

अतिसाराचा प्रतिबंध आणि निवारणासाठी उपलब्ध पद्धतींचे महत्त्व सांगताना, डॉ पवार म्हणाल्या की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) च्या ताज्या अहवालानुसार अतिसार झालेल्या पाच वर्षांखालील 60.6% मुलांना ओआरएस आणि फक्त 30.5% मुलांना झिंक देण्यात आले. याचा अर्थ मातांमध्ये जागरुकतेचा अभाव आहे.” अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण किमान पातळीवर आणण्यासाठी डॉ पवार यांनी अधिकाधिक जनजागृती मोहिमांवर भर दिला.यासाठी केंद्र सरकारचा संकल्प आणि वचनबद्धता लक्षात घेऊन, बालपणातील अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी 2014 पासून तीव्र अतिसार नियंत्रण पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – मुंबईतील महिला प्रवाशांची ‘सुरक्षा’ होणार अधिक ‘BEST’!)

उन्हाळा आणि मान्सूनमध्ये होणारा अतिसाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या कालावधीत हा पंधरवडा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध प्रशासन स्तरांवर जनजागृती, रॅली , शालेय स्तरावर स्पर्धा, नेत्यांकडून राज्य आणि जिल्हास्तरीय कार्यक्रम राबवून मोठ्या प्रमाणावरील बहु-क्षेत्रीय सहभाग लाभदायी ठरेल, असे त्या म्हणाल्या. शुद्ध पेय जलाचे सेवन, स्तनपान किंवा योग्य पोषणयुक्त आहार, स्वच्छता आणि हात धुण्यासारख्या स्वच्छतेच्या सवयी अतिसाराला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, असे डॉ पवार म्हणाल्या. स्वच्छ भारत मिशनसारख्या उपक्रमातूनही यावर भर देण्यात आला आहे. वर्तणुकीतील या लहान बदलांमुळे बालमृत्यू दर कमी करण्यात भारताला लक्षणीय मदत झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.