ठाणे पोलिसांची वेबसाईट मंगळवारी हॅक झाली आहे. अशा अनेक ठिकाणी हॅक झालेल्या वेबसाईट संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे. नुपूर शर्मा प्रकरणात सध्या देशातील अनेक खासगी आणि सरकारी वेबसाईट्स हॅक झाल्याचे समोर आले आहे. अशातच आता ठाणे पोलिसांची बेवसाईट हॅक करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय सायबर हल्ल्याची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुष्टी केली आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
गेल्या २ दिवसात देशात अनेक वेबसाईट हॅक
या परिषदेत बोलताना ते म्हणाले, गेल्या २ दिवसात देशात अनेक वेबसाईट हॅक झाल्यात. आपले सायबर प्रमुख याबद्दल तपासणी करत आहेत. ठाणे पोलिसांची वेबसाईट देखील हॅक झाली आहे. राज्य सरकारने याचा आढावा घेतला आहे. यावर कोणत्या उपाययोजना करायच्या यावर यंत्रणा काम करत आहेत.
समाज माध्यमांमध्ये दुफळी माजवण्याचे काम सुरू
समाज माध्यमांमध्ये दुफळी माजवण्याचे काम वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. त्याचाच हा परिणाम आहे, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर हॅकर्सनी मंगळवारी सकाळी सायबर हल्ला चढवला. हॅकर्सनी ही वेबसाईट बंद पाडत तिथे आपला बॅनर झळकावला. हॅकरने त्याच्या संदेशात जगभरातील मुसलमानांची माफी मागा, असे म्हटले आहे. आमच्या प्रेषिताची बदनामी होत असल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असेही हॅकरने झळकावलेल्या बॅनरवर लिहिले आहे.
Join Our WhatsApp Community