लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी तब्बल 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना सहायक राज्य कर आयुक्तांनाच पकडले. त्यामुळे या विभागात खळबळ उडाली आहे. धनंजय जनार्दन शिरसाठ असे या सहायक आयुक्तांचे नाव आहे. ते ठाण्यातील विक्रीकर विभागत कार्यरत आहेत. लाच स्वीकारल्याप्रकरणी त्यांच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील कापुरबावडी येथील एका हाॅटेल व्यावसायिकाने शिरसाठ यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे कापुरबावडी येथे हाॅटेल असून त्याचे मागील वर्षाचे असेसमेंट न करण्यासाठी व नवीन जीएसटी नंबर काढून देण्यासाठी शिरसाठ यांनी 30 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार आल्यानंतर, 8 जूनला केलेल्या पडताळणीमध्ये शिरसाठ यांनी 30 लाखांची मागणी करुन त्यातील 20 लाख रुपये स्वीकारण्याचे निष्पन्न झाले.
( हेही वाचा: मुख्य लिपिक पदाची २६ जून रोजी परीक्षा; नावे नोंदवण्याची आजची अंतिम तारीख )
सापळा रचून पकडले
लाचलुचपत विभागाच्या ठाणे शाखेने सापळा रचून शिरसाठ यांना 20 लाख रुपये स्वीकारताना ठाण्यातील कापुरबावडी येथील एका हाॅटेलमध्ये पकडले. तब्बल 30 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने या विभागात मोठा भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
Join Our WhatsApp Community