मुंबई महापालिकेच्या गोरेगाव पी दक्षिण प्रशासकीय विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या विभागात आरक्षणाचा जोरदार फटका विद्यमान नगरसेवकांना बसला आहे. या प्रभागात मागील निवडणुकीत ३ प्रभाग हे खुले होते, ते नवीन प्रभाग आरक्षणात एकने संख्या घटून दोन प्रभाग झाले आहेत. तर महिलांचे प्रभाग मागील वेळच्या संख्येत दोनने वाढून पाच एवढे झाले आहेत. तर अनुसूचित जातीचे दोन प्रभाग बनले असून दोन्हीही खुल्या प्रवर्गातील आहे. त्यामुळे या विभागात जे एकूण ९ नगरसेवक आहेत, त्यातील ०६ नगरसेवक हे एकट्या भाजपचे असून त्यासर्वांचे प्रभाग बदलले गेले आहेत. त्यामुळे या विभागात आरक्षणाचा मोठा फटका गोरेगावमध्ये बसला जाण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Good News! लवकरच वाढणार पेन्शन आणि निवृत्तीचे वय, काय आहे सरकारची योजना?)
गोरेगावमध्ये शिवसेनेचे तीन आणि भाजपचे सहा नगरसेवक असून नवीन प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षणात भाजपला आरक्षणामुळे दगाफटका होण्याची भीती आहे. भाजपच्या एकमेवर राजुल देसाई यांचा प्रभाग खुला झाला आहे. परंतु त्यांचे पती समीर देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपसाठी हा प्रभाग राहिलेला नाही. प्रभाग खुला झाल्याने समीर देसाई हे महापालिकेत पुनरागमन करतात की पुन्हा पत्नी किंवा अन्य कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात याकडे लक्ष आहे.
भाजपचे दिपक ठाकूर, हर्ष पटेल, संदीप पटेल या तिघांचेही प्रभाग महिला आरक्षित झाले आहेत. आजवर विद्या ठाकूर या नगरसेवक म्हणून निवडून यायच्या. परंतु आता त्या आमदार बनल्याने ठाकूर घरातील सून आता निवडणूक रिंगणात उतरते का हे पहावे लागेल. तर माजी नगरसेवक दिलीप पटेल यांनी आपल्या मुलाला राजकारणात आणून नगरसेवक बनवले, परंतु आता आरक्षणानेच घात केल्याने त्यांनाही एक तर घरातील कोणा महिलेला निवडणूक उतरावे लागणार आहे. तर भाजपच्या श्रीकला पिल्ले यांचा प्रभागच अनुसूचित जातीकरता राखीव झाल्याने त्यांना अन्य प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. तर भाजपच्या प्रिती सातम यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्या सेफ झोनमध्ये आहेत.
अनूसुचित जाती महिला करता राखीव असलेल्या प्रभागातून निवडणूक जिंकून आलेल्या रेखा रामवंशी यांचा प्रभाग पुन्हा अनूसुचित जातीकरताच राखीव झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून पुन्हा एकदा माजी नगरसेवक जितेंद्र वळवी यांना महापालिकेचे दरवाजे खुले झालेले आहेत. तर शिवसेनेचा साधना माने यांचा प्रभाग खुला झाल्याने आता शिवसेनेकडून मोठी दावेदारी असेल, याठिकाणी आमदारांचे पूत्र आणि युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य अंकित प्रभू यांना निवडणूक लढण्याचा मार्ग खुला झाला आहे. तर स्थापत्य उपनगरे समिती अध्यक्षपद भूषवणाऱ्या स्वप्निल टेंबवलकर यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्या पत्नी वर्षा टेंबवलकर यांना महापालिकेत पुनरागमन करता येणार आहे.
अशाप्रकारे आहे विद्यमान प्रभाग, नगरसेवक आणि नवीन प्रभाग, त्यांचे आरक्षण
प्रभाग ५०, खुला प्रवर्ग ( दिपक ठाकूर, भाजप) नवीन प्रभाग: ५२, आरक्षण : महिला
नवीन प्रभाग रचना : गोरेगाव राम नगर, प्रेम नगर, पिरामल नगर, चिंचोली बंदर, आरे रोड, उन्नत रोड क्रमांक २
प्रभाग ५१, खुला प्रवर्ग ( स्वप्निल टेंबवलकर, शिवसेना) नवीन प्रभाग: ५३, आरक्षण : महिला
नवीन प्रभाग रचना : जयप्रकाश नगर, हनुमान टेकडी, पहाडी स्कूल, विरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट, यशोधाम विद्यालय मार्ग, विश्वेश्वर नगर, जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग
प्रभाग ५२, ओबीसी महिला( प्रिती सातम, भाजप) नवीन प्रभाग: ५४, आरक्षण : महिला
नवीन प्रभाग रचना : यशोधाम विद्यालय, गोकुळधाम, माळीनगर, राम नगर, दादासाहेब फाळक चित्रनगर, आरे रोड
प्रभाग ५३, अनुसूचित जाती महिला( रेखा रामवंशी,शिवसेना) नवीन प्रभाग: ५५, आरक्षण : अनुसूचित जाती
नवीन प्रभाग रचना : आरे कॉलनी, चित्रनगरी, रॉयलपाम, युनिट नं २२, आरे डेअरी,महानंद डेअरी,एसआरपीएफ
प्रभाग ५४, सर्वसाधारण महिला( साधना माने, शिवसेना) नवीन प्रभाग: ५६, आरक्षण : खुला प्रवर्ग
नवीन प्रभाग रचना : पांडुरंगवाडी, सोनावाला इंडस्ट्री,कामा इंडस्ट्री, चुरीवाडी, गोरेगाव रेल्वे स्थानक
प्रभाग ५५, ओबीसी ( हर्ष पटेल, भाजप) नवीन प्रभाग: ५७, आरक्षण : महिला
नवीन प्रभाग रचना : मिठा नगर, सिध्दार्थ नगर, जलनिधी सोसायटी, इन ऑर्बिट रोड, न्यू लिंक रोड, ग्रामपंचायत रोड, जवाहर नगर रोड,
प्रभाग ५६, सर्वसाधारण महिला( राजुल देसाई, भाजप) नवीन प्रभाग: ५८, आरक्षण : खुला प्रवर्ग
नवीन प्रभाग रचना : प्रेम नगर, यशवंत नगर, मोतीलाल नगर, महात्मा गांधी रोड
प्रभाग ५७, महिला(श्रीकला पिल्लई, भाजप) नवीन प्रभाग: ६०, आरक्षण : अनुसूचित जाती
नवीन प्रभाग रचना : मिल्लत नगर, भगतसिंह नगर,ओशिवरा नाला,मोगरा नाला
प्रभाग ५८, खुला प्रवर्ग ( संदिप पटेल, भाजप) नवीन प्रभाग: ५९, आरक्षण : महिला
नवीन प्रभाग रचना : जवाहर नगर रोड,बेस्ट नगर, अमृतन नगर, सोमानी ग्राम, जवाहर नगर,एच एस रुपवते मार्ग, पोस्ट ऑफिस
सन २०१७ च्या निवडणुकीतील आरक्षण :
खुला प्रवर्ग : ३ प्रभाग, महिला आरक्षित : ३ प्रभाग, ओबीसी: एक महिला व एक खुला , एस सी : एक महिला
सन २०२२ च्या निवडणुकीतील आरक्षण :
खुला प्रवर्ग : २ प्रभाग, महिला आरक्षित : ५ प्रभाग, एस सी : दोन प्रभाग
Join Our WhatsApp Community