रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांचा ताफा सोलापुरातील एका हाॅटेल मालकाने अडवल्याची घटना घडली. 2014 च्या निवडणुकीवेळी राहिलेले बिल द्यावे यासाठी खोत यांचा ताफा अडवला. हाॅटेल मालक अशोक शिनगारे यांनी हा ताफा अडवला. सध्या हा व्हिडीओ राज्यात चांगलाच व्हायरल होत आहे. त्यानंतर शुक्रवारी सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत, यामागे राष्ट्रवादीचा लाल टोमॅटोसारखा गाल असलेला नेता असल्याचा आरोप केला आहे.
योग्य वेळी नेत्याचे नाव सांगणार
अशोक शिनगारेंविरोधात अनेक गुन्हे दाखल असून सोने चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती खोत यांनी दिली. शिनगारे यांच्याविरोधात चोरीसह 8 गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय चेक बाऊन्स प्रकरण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली शिनगारेंविरोधात गुन्हा दाखल असल्याचे, खोत यांनी सांगितले. गुरुवारी व्हायरल झालेल्या व्हिडीओमागे टोमॅटोसारखे लाल गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा हात आहे. त्याने या व्हिडिओसाठीची तयारी केली होती. शिनगारे यांना जेवढे सांगितले होते, तेवढीच वाक्ये तो बोलला. ताफा आल्यानंतर पद्धतशीरपणे व्हिडिओ काढून व्हायरल केला असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. या नेत्याचे नाव योग्य वेळी सांगणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
( हेही वाचा: लष्कर भरतीसाठी अग्निपथ योजनेच्या किमान वयोमर्यादेत बदल; सरकारचा निर्णय )
शिनगारेंविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, हाॅटेल मालक शिनगारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करत शिनगारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रयत क्रांती संघटनेचे सांगोला तालुकाध्यक्ष भारत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. सांगोला पोलीस ठाण्यात भादंवि कलम 341, 186, 504 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
Join Our WhatsApp Community