राज्यसभेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शिवसेनेची सावध भूमिका, एक दिवस आधीच आमदारांना बोलावले मुंबईत

189

राज्यात सध्या 20 जून रोजी होणा-या विधान परिषदेच्या निवडणुकांचे वारे जोरदार घोंघावत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकांप्रमाणेच ही निवडणूकही चुरशीची होणार यात कुठलीही शंका नाही. म्हणूनच सर्वच पक्षांनी या निवडणुकांसाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. राज्यसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मात्र शिवसेनेने सावध पवित्रा घेतला असल्याचे समजत आहे. या निवडणुकांमध्ये कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून आता शिवसेनेने शुक्रवारी शिवसेना आमदारांची तातडीची बैठक बोलावली असल्याचे समजत आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसी आहे. राज्यसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर शिवसेनेसाठी आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांसाठी विधान परिषदेची निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षांनी देखील या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.

(हेही वाचाः म्युच्युअल फंडात पैसे गुंतवताय? SEBI च्या या नियमाकडे लक्ष द्या, नाहीतर होईल नुकसान)

शिवसेनेने घेतली खबरदारी

राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत अंतर्गत कलह असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देणा-या आमदारांना मतांसाठी गळ घालायला सुरुवात केली असल्याचे समजत आहे. त्यामुळे याची गंभीर दखल मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळेच शिवसेना आमदारांकडून दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेना आमदारांना आधीच मुंबईत बोलावण्यात आले असून, शुक्रवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथी गृहात त्यांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

एक दिवस आधीच उपस्थित राहण्याचे आदेश

राज्यातील शिवसेना आमदारांची शनिवारी पवईतील रेनसां हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. त्यानंतर याच हॉटेलमध्ये त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. पण आता शिवसेनेने सावधगिरीने पावले उचलत एक दिवस आधीच शिवसेना आमदारांना मुंबईत उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः विधान परिषद निवडणूक : भाजप सतर्क, मोर्चेबांधणीला सुरुवात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.