मुंबईत मोनो रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. मोनो रेल्वेने संत गाडगे महाराज स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांना महालक्ष्मी स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. कारण आता मोनोतून उतरल्यानंतर लागलीच महालक्ष्मी रेल्वे स्थानक गाठता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या दोन्ही स्थानकांदरम्यान ५०० मीटर अंतराची विशेष मार्गिका (ट्रॅव्हलेटर) उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.
मोनो-पश्चिम रेल्वेला जोडणारा पहिला ट्रॅव्हलेटर प्रकल्प
या दोन्ही स्थानकांदरम्यान उभारले जाणारे ट्रॅव्हलेटर प्रामुख्याने विमानतळ परिसरात उभारले जातात. प्रवाशांना चालण्यासह साहित्याची ने- आण करणे सोपे व्हावे, यादृष्टीने या विशेष मार्गिकांची रचना करण्यात येते. सध्या मुंबईत अशा मार्गिका नसल्यामुळे मोनो आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा हा पहिला ट्रॅव्हलेटर प्रकल्प ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – MSRTC: वारकरी Fit राहण्यासाठी ‘ST महामंडळा’कडून आरोग्य शिबीर)
कसा असणार ट्रॅव्हलेटर
एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास दुजोरा दिला असून, संत गाडगे महाराज मोनो रेल्वे स्थानक, परेचे महालक्ष्मी स्थानक व भुयारी मेट्रोला जोडण्यासाठी ट्रॅव्हलेटरची उभारणी केली जाणार आहे. हा ट्रॅव्हलेटर ५०० मीटर लांबीचा असेल, त्यावर ३ मीटर रुंदीच्या दोन मार्गिका तयार केल्या जातील. यासह पुढे असेही सांगितले की, सद्यस्थितीत ‘ट्रॅव्हलेटर’ची सुसाध्यता तपासण्याचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. तसेच त्याचे डिझाईन तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून हे काम पूर्ण झाल्यावर प्रत्यक्षात प्रकल्पासाठी पुढील पावले उचलली जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community