मोठ्या प्रतीक्षेनंतर कोल्हापूरातील राधानगरीत विसावलेल्या वाघाच्या आगमनाचा अखेर उलगडा झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राधानगरीतील निसर्ग अधिवासात रमलेला वाघ हा नजीकच्या भागांतच जन्मला असल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे. राधानगरी अभयारण्याचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाघ राज्यातच जन्मला असून, राधानगरीच्या जवळच्या पट्ट्यातंच जन्माला आल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
(हेही वाचाः नॅशनल पार्कमधील वाघाटीचा मृत्यू)
वनाधिका-यांची माहिती
२०१९ नंतर कोल्हापूरातील राधानगरीत यंदाच्या एप्रिल महिन्यात वाघाच्या पाऊलखुणा दिसल्या. वनाधिका-यांनी जंगलात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाचे छायाचित्र मिळाल्यानंतर वन्यजीवप्रेमींनाही वनविभागाने ही खुशखबर दिली. हा वाघ कर्नाटक-गोवा मार्गे राधानगरीत आल्याचा वनाधिका-यांचा प्राथमिक अंदाज होता. गोवा आणि कर्नाटक राज्यातील वनविभाशीही राधानगरीतील वनाधिका-यांनी संपर्क साधून याबाबतची माहिती मिळवली. दोन्ही राज्यांच्या कॅमेरा ट्रॅपमधील दस्तावेजात राधानगरीत आढळलेल्या वाघाची माहिती नव्हती.
(हेही वाचाः पोपट पाळणे हा गुन्हा, अशी होऊ शकते शिक्षा)
राधानगरी व नजीकच्या भागांत याआधीही कर्नाटकातून येणारे वाघ काही काळासाठी वास्तव्यास येऊन परतायचे. गेल्या तीन महिन्यांपासून हा वाघ राधानगरीतच वास्तव्यास आहे. वाघाची विष्ठा, पाऊलखुणा तसेच शिकारीचे पुरावे टेहाळणीसाठी जंगलात फिरणा-या पथकाला मिळत आहेत, अशी माहितीही विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांनी दिली.
Join Our WhatsApp Communityराधानगरीत आढळलेल्या वाघाचा जन्म तिलारी किंवा दोडामार्ग परिसरातील जंगलात झाला असावा. हा वाघ अंदाजे तीन ते चार वर्षांचा आहे. दोन वर्षांनंतर वाघ हा स्वतःचा प्रदेश शोधण्यासाठी जन्मलेल्या ठिकाणाबाहेर निघून जातो. त्याआधारे वाघाने आपला मुक्काम हलवत राधानगरीत प्रवेश केला. वाघ नर आहे की मादी याबाबत अजून उलगडा झालेला नाही.
-विशाल माळी, विभागीय वनाधिकारी, राधानगरी अभयारण्य, कोल्हापूर