भारतीय रेल्वे मार्गावरील आव्हानात्मक मार्गांपैकी एक असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. कोकण रेल्वेच्या मार्गाचे १०० टक्के विद्युतीकरण मार्च महिन्यात पूर्ण झाले असून आज सोमवारी, दि. २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण कऱण्यात येणार आहे.
(हेही वाचा – विधान परिषद निवडणुकीचं कसं आहे ‘गणित’? कोणासाठी पेपर सोपा, कोणाला कठीण?)
रत्नागिरी ते थिविम यादरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या ७४० किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर हे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. २०१६ मध्ये रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेच्या या विद्युतीकरणाला मंजुरी दिली होती. या विद्युतीकरणासाठी एकूण १२८७ कोटीं रुपये खर्च करण्यात आले आहे.
प्रवास प्रदूषणमुक्त होणार
उद्घाटन सोहळ्यानंतर कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग प्रदूषणमक्त वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे आता विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास देखील प्रदूषणमुक्त होणार आहे. यासाठी रत्नागिरी, मडगाव तसेच उडुपी येथे इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवरील रेल्वे गाड्यांना रिमोटद्वारे हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. गेल्या २४ मार्च मार्च रोजी या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्याकडून तपासणी करण्यात आली होती.
कोकण रेल्वे विजेवर धावण्यास सज्ज
कोकण रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित राहून झेंडा दाखवत विद्युतीकरण झालेल्या मार्गाचा शुभारंभ करणार आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गावर रत्नागिरी, मडगाव आणि उडुपी या तीन ठिकाणी यानिमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विद्युतीकरणामुळे आता या मार्गावरील गाड्या डिझेलऐवजी विजेवर धावणार असल्याने वर्षाकाठी डिझेवर होणाऱ्या खर्चात रेल्वेची सुमारे दीडशे कोटी रुपयांची बचत होणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून २२ आणि २४ मार्च रोजी तपासणी पूर्ण झाली झाली होती. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर आता कोकण रेल्वे विजेवर धावण्यास सज्ज झाली आहे.