राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक आला होता व त्यांना ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा ब्रेन स्ट्रोक मानसिक तणाव आणि छळातून आला असल्याचे पोलिसांनी रेणू शर्मा प्रकरणात न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रात म्हटले आहे. लिव्ह-इन पार्टनर करुणा शर्माच्या बहिणीने केलेल्या छळ आणि खंडणीच्या मागणीनंतर मानसिक तणावामुळे मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक येऊन त्यांना १३ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे मुंबई गुन्हे शाखेने दोषारोप पत्रात म्हटले आहे.
काय म्हटले दोषारोप पत्रात ?
धनंजय मुंडे यांच्याकडे ५ कोटींची मागणी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने २० एप्रिल रोजी रेणूला मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक केली होती. शनिवारी किल्ला न्यायालयात या प्रकरणात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. रेणूकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता, परंतु तिच्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले. पोलिसांनी सांगितले की बँकेच्या ओशिवरा शाखेत २०१७ मध्ये उघडलेल्या एका खात्यात मोठ्या प्रमाणात पैशांचा ओघ दिसून आला आणि फेब्रुवारीमध्ये फक्त ६.६५२ रुपये शिल्लक होते. असे दोषारोप पत्रात म्हटले आहे.
(हेही वाचा – “मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार!” भाजपच्या अनिल बोंडेंना वाटणारे ‘ते’ मिशीवाले कोण?)
पोलिसांनी इंदूर स्थित एका विकासकाचे जबाब नोंदवले असून त्यांनी सांगितले की, फेब्रुवारीमध्ये रेणूने इंदूरच्या नेपेनिया रोड येथील बीसीएम पार्कमध्ये सुमारे ५४.२लाख रुपयांना डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला होता. रेणूने खंडणीच्या पैशातून डुप्लेक्स फ्लॅट विकत घेतल्याचा दावा करणारी कागदपत्रे गुन्हे शाखेने दोषारोप पत्रात जोडली आहेत. रेणूला ५० लाख रुपये आणि आयफोन हवालाद्वारे दिल्याचे मुंडे यांनी यापूर्वी सांगितले होते. दोन हवाला आॅपरेटर्सनी मुंडे यांच्या वतीने इंदूरमध्ये रेणूला पैसे दिल्याचे सांगितले आहे.
सततचा छळ आणि खंडणीच्या मागणीमुळे मुंडे यांना नैराश्य आले होते, व त्यांना १२ ते १६ एप्रिल दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले. तक्रारदार मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक आला आणि त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आम्ही त्यांची हॉस्पिटलायझेशनची आणि वैद्यकीय अहवाल कागदपत्रे जोडली असल्याचे गुन्हे शाखेने दोषारोपपत्रात म्हटले आहे.
… तर ती पुन्हा बलात्काराची तक्रार दाखल करेल
त्यात पुढे म्हटले आहे की, रेणू यांनी ओशिवरा पोलिसांत खोटी तक्रार करून मुंडे यांना बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. “मुंडे आणि करुणा यांच्यात सुरू असलेल्या न्यायालयीन वादात मुंडेंवर दबाव आणण्यासाठी रेणूने हा आरोप केला,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. “गेल्या फेब्रुवारीमध्ये तिने पुन्हा मुंडे यांना धमकी दिली की, जर त्यांनी तिला रोख रक्कम, दुकान आणि महागडे फोन दिले नाही तर ती पुन्हा बलात्काराची तक्रार दाखल करेल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते, मित्र आणि नातेवाईकांची नावे घेईल असेही दोषारोप पत्रात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community