BMC Election 2022: दादर-माहिम आणि धारावीत काय आहे स्थिती, जाणून घ्या!

185
धारावी, दादर व माहिम या तीन विभागांच्या महापालिकेच्या जी- उत्तर विभागांमध्ये तब्बल ११ नगरसेवक असून त्यातील सात नगरसेवक हे एकट्या धारावीतील आहेत. तर माहिममध्ये दोन आणि दादरमध्ये दोन नगरसेवक आहेत. मागील निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकही आरक्षण न पडलेल्या या विभागांत यंदा दोन प्रभाग या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. धारावीतील काँग्रेसचे बब्बू खान आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेशमबानो खान या दोन्ही नगरसेवकांचे प्रभाग अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरता राखीव झाले आहेत. या ११ प्रभागांपैंकी केवळ चारच प्रभाग खुले झाले आहेत, तर पाच प्रभाग हे महिला राखीव झाले आहेत.

…तर आजी व माजी मनसैनिक विरोधात लढत

या जी- उत्तर विभागातील माहिममधील शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य यांचा प्रभाग महिला राखीव झाला आहे. त्यामुळे आजवर नशिबाची साथ मिळणाऱ्या वैद्य यांना यावेळी घरी बसावे लागणार आहे. तर माहिममधील शीतल गंभीर यांचा प्रभाग महिला राखीव झाल्याने त्या सेफ झोनमध्ये आहेत. परंतु माहिममध्ये ही एकमेव जागा मिळवत भाजपने याठिकाणी खाते खोलले असले तरी, यंदाच्या निवडणुकीत धनुष्यबाणाने कमळाचा देठच तोडून टाकण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी सेनेने पूर्ण ताकद लावण्यास सुरुवात केली आहे.  त्यामुळे गंभीर यांना या प्रभागात शिवसेनेशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. तर जुने प्रभाग क्रमांक  १९१ व १९२ हे सभागृहनेत्या विशाखा राऊत आणि प्रिती पाटणकर या दोन्ही नागरसेविकांचे प्रभाग खुले झाले आहेत. हे दोन्ही प्रभाग आता १९७ व १९८ असे  ओळखले जाणार असून, राऊत यांच्या जागेवर सेनेच्या समाधान सरवणकर यांचा डोळा आहे. तर मनसेतून संदीप देशपाडे यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे समाधान की विशाखा राऊत हे उमेदवारी मिळवतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. तर प्रभाग १९८ मधून माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांचा दावा असला तरी मनसेतून आलेल्या गिरीष धानुरकर यांचाही पक्का दावा असेल.  त्यामुळे दोघांच्या भांडणात ही जागा शाखाप्रमुख झगडे यांनाही जाऊ शकेल,असेही बोलले जात आहे. परंतु याठिकाणी मनसेच्यावतीने विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांचीही दावेदारी असून, त्यांना उमेदवारी दिल्यास या प्रभागात आजी व माजी मनसैनिक विरोधात ही लढत होईल.

यांचे प्रभाग झाले आरक्षित

धारावीमध्ये काँग्रेसच्या गंगा माने यांचा प्रभाग महिला आरक्षित झाला असून,  माने या तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरु शकतात, तर शिवसेनेच्या मरिअम्मल  थेवर व हर्षिला मोरे यांचे प्रभाग खुले झाले आहेत. मरिअम्मल स्वत: किंवा त्यांचे दीर हे प्रबळ दावेदार असून, हर्षला मोरे यांचे पती आशिष मोरे यांचीही प्रबळ दावेदारी समजली जात आहे. आशिष मोरे हे मनसेतून शिवसेनेत आले असले तरी मागील विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून लढत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हान निर्माण केले होते. शिवसेनेचा धारावीतील चेहरा असलेल्या वसंत नकाशे यांचा प्रभाग महिला राखीव झाल्याने त्यांना आपल्या पत्नीला निवडणूक  रिंगणात उतरावे लागणार आहे, तर शिवसेनेचे टी. जगदीश यांचा प्रभाग महिला राखीव झाल्याने त्यांनाही आपल्या मुलीला निवडणूक रिंगणात उतररावे लागणार आहे.
विभाग : जी/उत्तर (दादर- माहिम, धारावी)
प्रभाग क्रमांक १८२, खुला प्रवर्ग (मिलिंद वैद्य,शिवसेना), नवीन प्रभाग : १८८, आरक्षण : (महिला)
नवीन प्रभाग रचना : माहिम कोळीवाडा, बाबासाहेब आंबेडकर नगर, माहिम मकरंद सोसायटी,
प्रभाग क्रमांक १८३, ओबीसी महिला (गंगा माने,काँग्रेस), नवीन प्रभाग : १८९, आरक्षण : (महिला)
नवीन प्रभाग रचना : नेचर पार्क, धारावी आगार, नाईक नगर माहिम शीव लिंक रोड, शीव वांद्रे लिंक रोड
प्रभाग क्रमांक १८४, खुला प्रवर्ग (बब्बू खान, काँग्रेस), नवीन प्रभाग : १९०, आरक्षण : ( एस.सी महिला)
नवीन प्रभाग रचना : शीव रेल्वे स्टेशन संत रोहिदास मार्ग, महात्मा गांधी नाक्यापासून लक्ष्मीबाग, इंदिरा  नगर, राजीव गांधी नगर, श्रमिक विद्यापीठ
प्रभाग क्रमांक १८५, खुला प्रवर्ग (टी जगदीश,शिवसेना), नवीन प्रभाग : १९१, आरक्षण : (महिला)
नवीन प्रभाग रचना : एस्ट्रेला बॅटरी कंपनी, राजीव गांधी नगर,आंध्रा व्हॅली मार्ग,९० फूट रोड
प्रभाग क्रमांक १८६, ओबीसी (वसंत नकाशे,शिवसेना), नवीन प्रभाग : १९२, आरक्षण : (महिला)
नवीन प्रभाग रचना  : भारतरत्न आंबेडकर चौक येथील धारावी मेनरोड व मुकुंदनगर रोड नाक्यापासून मुकुंद नगर पूर्व आणि धारावी व्हिलेज पूर्व
प्रभाग क्रमांक १८७, महिला प्रवर्ग (मरिअम्मल थेवर,शिवसेना), नवीन प्रभाग : १९३, आरक्षण : (खुला)
नवीन प्रभाग रचना : आंबेडकर चौक येथील मुत्तुराम  लिंगमतेवर व धारावी मेनरोडच्या  नाक्यापासून संत कबीर मार्गापर्यंत,  शाहू नगर, धारावी व्हिलेज, नवरंग कंपाऊंड, शम्मीनगर
प्रभाग क्रमांक १८८, महिला प्रवर्ग ( रेशमबानो खान), नवीन प्रभाग : १९४, आरक्षण : (एस.सी महिला)
नवीन प्रभाग रचना : धारावी मेनरोड व संत कंक्कया मार्गाच्या नाक्यापासून रामास्वामी चौक येथील गणेश मंदिर मार्गापर्यंत, शेठवाडी, आर पी नगर, भाटीया नगर
प्रभाग क्रमांक १८९, महिला प्रवर्ग (हर्षला मोरे,शिवसेना), नवीन प्रभाग : १९५, आरक्षण : (खुला)
नवीन प्रभाग रचना : माटुंगा लेबर कॅम्प येथील संत कबीर मार्ग व आध्रा व्हॅली मार्गाच्या नाक्यापासून हनुमान नगर,लेबल कॅम्प, टिळक ब्रीज  येथे टिळक मार्गापर्यंत
प्रभाग क्रमांक १९०,ओबीसी महिला(शितल गंभीर,भाजप), नवीन प्रभाग : १९६, आरक्षण : (महिला)
नवीन प्रभाग रचना  : के जे खिलनानी हायस्कूल  व मोरी रोड  नाक्यापासून माटुंगा रोड रेल्वे स्टेशन, नवजीवन सोसायटी कॉलनी, वांजावाडी, गीतानगर, व्हीएसएएल कॉलनी,
प्रभाग क्रमांक १९१, महिला प्रवर्ग (विशाखा राऊत,शिवसेना), नवीन प्रभाग : १९७, आरक्षण : (खुला)
नवीन प्रभाग रचना : दिलीप गुप्ते व टि एच कटारिया मार्गाच्या नाक्यापासून माटुंगा रेल्वे स्टेशन, बाळगोविंददास मार्ग, सिध्दी विनायक मंदिर, महालक्ष्मी सिंध् कॉलनी, शिवाजीपार्क
प्रभाग क्रमांक १९२, महिला प्रवर्ग (प्रिती पाटणकर,शिवसेना), नवीन प्रभाग : १९८, आरक्षण : (खुला)
नवीन प्रभाग रचना : दादर पश्चिम बाबासाहेब आंबेडकर नगर, कामगार क्रीडा  केंद्र, गडकरी चौक येथील गोखले मार्ग, बाई पद्ममा बाई ठक्कर  मार्गाच्या नाक्यापासून टिळक ब्रीज पर्यंत, काकासाहेब गाडगीळ मार्ग,
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.