मोजणीआधीच काँग्रेसला दणका, असंवेदनशीलतेवर चौफेर टीका

169

विधान परिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप नोंदवला होता. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे भाजपचे आमदार गंभीर आजारी असताना त्यांनी मतदान केले. त्यांच्या मतदानावरुन काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करत आक्षेप घेण्यात आला होता. पण हा आक्षेप आता निवडणूक आयोगाने फेटाळल्यामुळे काँग्रेसला मतमोजणीआधीच दणका देण्यात आला आहे. पण काँग्रेसच्या या आक्षेपामुळे भाजपकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना आजारपणामुळे चालता येत नसल्याने त्यांना भाजपच्या इतर आमदारांनी आधार देत मतदानासाठी नेले. तसेच त्यांनी मतदान केलेली मतपत्रिका ही भाजपच्या इतर आमदारांनी मतपत्रिकेत टाकल्यामुळे काँग्रेसने त्यांच्या मतांवर आक्षेप नोंदवला होता. पण राज्य निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळून लावत आपला निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे आता लवकरच मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

(हेही वाचाः मतमोजणीआधीच काँग्रेसचा रडीचा डाव)

मविआचे खालच्या पातळीचे राजकारण

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतांबाबत निवडणूक आयोगाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली होती. त्यामुळे काँग्रेसने घेतलेल्या या आक्षेपामध्ये कुठलेही तथ्य नसून, हा आक्षेप निवडणूक आयोगाकडून नक्कीच फेटाळण्यात येईल, असा विश्वास भाजप आमदार संजय कुटे यांनी व्यक्त केला आहे. तसेच टिळक आणि जगताप हे दोघेही गंभीर आजारी असताना देखील त्यांनी मतदान करत लोकप्रतिनिधीचे कर्तव्य बजावले. पण त्यांच्यावर असा आक्षेप घेतल्यामुळे महाविकास आघाडीकडून खालच्या पातळीचे राजकारण करण्यात येत असल्याची टीकाही कुटे यांनी केली आहे.

भाजपची जोरदार टीका

काँग्रेसने घेतलेला हा आक्षेप म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर भाजप नेते अनिल बोंडे यांनी ट्वीट करत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘काँग्रेसला अवदसा आठवली, योद्ध्यांचाही अपमान केला. काँग्रेसला निष्ठावंतांची किंमतच कशी कळणार? सगळी गद्दारांची फौज..’, अशा शब्दांत अनिल बोंडे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.