विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आधीच मतमोजणीला दोन तास उशीर झालेला असताना, आता पहिल्या फेरीच्या मतमोजणीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे प्रत्येकी एक मत बाद झाले आहे. त्यामुळे आता 285 पैकी 283 मतांची मोजणी करुन विधान परिषद निवडणुकीचा निकाल लवकरच हाती येणार आहे.
दोन मते बाद
काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतल्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला तब्बल दोन तास उशीर झाला होता. त्यानंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील मतावर आक्षेप घेतल्यामुळे ते मत बाजूला ठेवण्यात आले होते. त्यानंतर महाविकास आघाडीकडून भाजप उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील मतावर सुद्धा आक्षेप नोंदवण्यात आला. त्यामुळे हे मत बाजूला काढून काही काळ मतमोजणी थांबवण्यात आली होती. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही हे आक्षेपसत्र सुरू असल्यामुळे या निवडणुकीचा निकालही रात्र गाजवणार अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, बाजूला काढलेली ही दोन्ही मतं बाद ठरवून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.
कोट्यात फरक नाही
विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 26 मतांचा कोटा आवश्यक आहे. पण 285 पैकी आता 283 मतं वैध ठरल्यामुळे या मतांच्या कोट्यावर काही फरक पडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण यामुळे मतांच्या कोट्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. याआधी 25.91 मतांचा कोटा आता 25.71 झाल्यामुळे मतांचा 26 हा कोटा कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community