राज्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे वरीष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १२ हून अधिक आमदारांमध्ये नाराजी आहे. तसेच निकालनंतर शिवसेनेत फूट पडल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या असताना राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्यासह इतर बंडखोर आमदार हे भाजपच्या संपर्कात असताना भाजपनेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत.
भाजपचे वरिष्ठ नेत्यांसह देवेंद्र फडणवीस आज सकाळीच तातडीने दिल्लीला दाखल होत त्यांनी भेटीगाठी घेतल्या आहेत. यावेळी जेपी नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेतली आहे. भाजपच्या गोटात नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण भाजपकडून मोठ्या हालचाली होताना दिसताय. भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीला दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा फडणवीस सरकार येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसताय.
(हेही वाचा – एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेपूर्वी सोमय्यांनी दिला आकड्यांचा हिशोब!)
फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येणार
विधान परिषद निवडणुकीत झटका बसल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. निकालानंतर एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. शिंदे यांच्यासह सेनेचे इतर काही आमदार देखील आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येणार आहे. त्याच्या हालचाली कालच्या विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर सुरू झाल्या आहेत, असे सूचक वक्तव्य आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी साताऱ्यातील सुरुची बंगला येथे मंगळवारी केले आहे.
Join Our WhatsApp Community