राज्यात मंगळवारी कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पुन्हा घटल्याचे दिसून आले. राज्यात आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८२ टक्के एवढे नोंदवले गेले आहे. मात्र पहिल्यांदाच नव्या रुग्ण नोंदीत आणि डिस्चार्ज रुग्णांच्या नोंदीत कमी संख्येचा फरक आढळला.
राज्यात ३ हजार ६५९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
मंगळवारी राज्यात ३ हजार ६५९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याचवेळी कोरोना उपचारांतून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ३५६ एवढी नोंदवली गेली. परिणामी, रुग्णसंख्या वाढीचा दर नियंत्रणात राखण्यास आरोग्य यंत्रणेला यश आले. राज्यात सध्या २४ हजार ९१५ कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात आहेत. मात्र दरदिवसाला किमान एक रुग्ण मुंबईत दगावत असल्याचे मंगळवारीही दिसून आले. बाकी इतर जिल्ह्यांत कोरोनाचा मृत्यूदर अभावानेच आढळून येत आहे. गेल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. राज्यात इतरत्र रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत नाही आहे.
राज्यभरात मुंबईत १४ हजार १४६ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार दिले जात आहेत. ठाण्यात ५ हजार ५६९, पुण्यात २ हजार ११३, रायगडात १ हजार ४६, पालघरात ७५९ एवढी सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली आहे. नागपूरातही ३१७ कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात आहेत.