राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होणार असल्याचे दिसतेय. शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, माझ्यासोबत केवळ ३५ नाही, तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे, यासह आणखी १० आमदार सोबत येणार आहेत असा त्यांनी दावा केला.
(हेही वाचा – एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत भाजपाचे ‘वेट अँड वॉच’चे धोरण – चंद्रकांत पाटील)
काय म्हणाले शिंदे
शिवसेनेचे माझ्यासोबत ४० आमदार सोबत आहेत. आणखी १० आमदार येणार आहेत, असा दावा ‘जय महाराष्ट्र’ म्हणत एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी बोलताना केला. यासह बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यांच्या मार्गावरच आमची वाटचाल राहील, असे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा – ‘ते लवकरच परत येतील’, एकनाथ शिंदेंबाबत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास)
शिंदे आपल्या भूमिकेवर कायम
एकनाथ शिंदे यांची मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना परत येण्याचं आवाहन केले आहे. पण एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर कायम आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुजरातच्या सूरतहून हे सर्व बंडखोर आमदार गुवाहटीला रवाना झाले आहेत. आमदारांसोबत कोणताही संपर्क राहू नये यासाठी त्यांना गुवाहटीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
… तरी चालेल पण भाजपसह सरकार स्थापन करा
दरम्यान, वरिष्ठ नेत्यांकडून शिंदेंची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम असून उद्धव ठाकरेंशी देखील त्यांनी फोनवरून चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, भाजपसोबत जावे हीच पक्ष हिताची भूमिका आहे आणि तसं आश्वासन मला द्यावं. मला मंत्रिपद दिले नाही तरी चालेल पण भाजपसह सरकार स्थापन करा.
Join Our WhatsApp Community