ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, त्या दिवशी मी माझी संघटना बरखास्त करेन, असे विचार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर भाषणात मांडले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेसाठी तडजोड केलेली शिवसैनिकांना मान्य नाही. मुख्यमंत्री पदी असताना ज्या शरद पवार यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणे शिवसैनिकांना मान्य नसून शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका शिवसैनिकांच्या मनातीलच आहे. त्यांनी जे केले ते योग्य असून पक्ष तत्व आणि विचारांशी प्रतारणा करतो, तेव्हा निष्ठावान कार्यकर्ताच अशी भूमिका मांडत असतो, अशी खदखदच आता शिवसैनिक व्यक्त करू लागले आहेत. शिवेसेनेच्या वाढलेल्या या वृक्षांची फांदी अशी तुटू देऊ नका, उद्धव साहेब, पक्षाला वाचवा अशी आर्जवी शिवसैनिक करताना दिसत आहे.
तिथेच हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व संपले
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ४० आमदार बंड करत बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आज शाखा-शाखा आणि नाक्या-नाक्यावर ज्येष्ठ आणि निष्ठावान शिवसैनिक खासगीत व्यक्त होताना दिसत आहे. शिवसैनिक म्हणतात, शिवसेना पक्ष हा विचार आणि तत्वावर आधारित आहे. पण या दोन्ही बाबींना पक्षात तिलांजली देण्यात आली आहे. तिथेच हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व संपले.
सत्तेसाठी समझोता आम्हाला मान्य नाही
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आजही वेळ गेली नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना समजून घ्यायला हवे. सत्तेच्या खुर्चीला लाथ मारून संघटनेच्या तत्त्वांशी समझोता करायला हवा. त्या तत्त्वांना बाधा आणू नये. जे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाते तेच आमचे नेते. सत्तेसाठी समझोता आम्हाला मान्य नाही, असे ते सांगतात. तर काँग्रेस समवेत जाणे जुन्या शिवसैनिकांना पचलेले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात असे म्हटले होते की, ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, त्या दिवशी मी माझी संघटना बरखास्त करेन. पण बाळासाहेबांचे हिंदुत्व आज राहिलेलं नाही. संघटनेसाठी आम्ही शिवसैनिक आजही मरायला तयार आहोत. पण आम्ही बाळासाहेबांचा विचार सोडून जगू शकत नाही.
काय आहे शिवसैनिकांच्या मनातील भावाना?
बाळासाहेबांनी कधीही पदाची लालसा ठेवली नाही. कुठलेही पद भूषवले नाही. तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांचा दबदबा तथा हुकूमत होती. एकनाथ शिंदे यांनी मोठी रिस्क घेतली आहे. त्यांच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकाला हे पाऊल उचलावे लागते. हे पाहून शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. पण जे ते बोलले ते योग्यच बोलले. त्या भावना तमाम शिवसैनिकांच्या आहेत. अशी भूमिका कुटुंब प्रमुखच घेऊ शकतात, अशीही चर्चा शिवसैनिक करताना दिसतो.
(हेही वाचा – महाराष्ट्रातील राजकीय पेचावर राऊतांचं मोठं ट्वीट, ‘मविआ’ सरकार होणार बरखास्त?)
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता चांगला निर्णय घ्यायला हवा. शिवसेनेचे हे जे झाड उभे राहिले आहे, त्या झाडाची फांदी तुटू नये असं पहावं. मागील निवडणुकीनंतर जर आपण विरोधी पक्षात बसलो असतो, तर पुढील वेळी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची एक हाती सत्ता आणू शकलो असतो. पण सत्तेच्या मागे धावून संघटनेच्या नितीमूल्यांशी तडजोड करत जी सत्ता मिळवली त्यात संघटना मजबूत होण्याऐवजी कमजोर बनत चालली. आज शिवसैनिक हा बाळासाहेबांनी बाळकडू पाजल्याने तो आजही कडवट आहे. पण हा कडवटपणा पक्षाचा विचार आणि तत्व असेल तरच. जर पक्ष याविचार तत्वाला विसरला असेल, तर शिवसैनिकांकडून कडवटपणाची अपेक्षा करू नये.
वीर सावरकरांचा सन्मान करू न शकणाऱ्यांसोबत युती मान्य नाही
बाळासाहेबांना कधीही सत्तेची लालसा नव्हती जर त्यांनी मनात आणले असते तर दिल्लीच्या तख्तावर विराजमान होऊन राज्य करू शकले असते. तीस वर्षांची युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी केलेली आघाडी शिवसैनिकांना मान्य नाही. जे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सन्मान करू शकत नाही. त्यांच्याशी युती आम्हाला मान्य नाही, असे शिवसैनिक बोलतात.
Join Our WhatsApp Community