शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधातील बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांना भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विट करून चांगलेच शाब्दिक चिमटे काढल्याचे दिसून आले आहे. राज्यात सध्या सुरू असलेली राजकीय परिस्थिती पाहून संजय राऊत खूश असतील असे नारायण राणेंनी म्हटले आहे. दरम्यान, शिंदेसह असलेले काही आमदार भाजपमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण आले असताना नारायण राणेंनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
नारायण राणेंनी काय म्हटले ट्विटमध्ये
नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने. यापूर्वीही एक ट्विट करत नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले होते. नारायण राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले होते की, शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता, हे ट्विट देखील चर्चेत आले होते.
(हेही वाचा – महाविकास आघाडी सरकार कोसळणार? पवारांचे दोन शब्दांत उत्तर)
संजय राऊत खुश!
कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने.— Narayan Rane (@MeNarayanRane) June 22, 2022
राखेतून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता ठाकरे सरकारच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिंदेंनी पक्षाविरोधात बंड पुकारला तेव्हापासून राज्यात राजकीय नाट्य घडताना दिसत आहे. शिवसेना हा संघर्ष करणारा राजकीय पक्ष आहे. आमच्याकडे राखेतून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल. पण सत्ता परत मिळवता येईल. पक्षाची प्रतिष्ठा ही आमच्यासाठी सर्वोच्च आहे, असे बुधवारी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – महाराष्ट्रातील राजकीय पेचावर राऊतांचं मोठं ट्वीट, ‘मविआ’ सरकार होणार बरखास्त?)
Join Our WhatsApp Community