पालकांना आपल्या मुलीच्या चांगल्या शिक्षणासह त्यांच्या लग्नाचीही चिंता असते. यासाठी पालक अनेक नव्या नव्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी “सुकन्या समृद्धी योजनेचा” लाभ घेणे हा उत्तम पर्याय आहे. सध्या सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यावर ७.६ टक्के दराने व्याज मिळते. सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ या अभियानाचा भाग आहे. या योजनेअंतर्गत १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी हे खाते उघडता येणार आहे. यासाठी पॅनकार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.
( हेही वाचा : १ जुलै पासून सरकारी कर्मचाऱ्यांना ३०० ऐवजी ४५० सुट्ट्या?)
सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते कुठे उघडाल?
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला प्रथम पोस्ट ऑफिस किंवा बॅंकेत अकाउंट ओपन करावे लागेल. यासोबत तुम्हाला मुलीचा जन्म दाखला, फोटो आणि संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील.
- फॉर्मसह तुम्हाला किमान २५० रुपये कॅश डिपॉझिट भरावे लागेल.
- खाते उघडल्यानंतर तुम्ही रोख रक्कम, चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे जमा करू शकता.
योजनेचे नवे नियम व फायदे
- सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यावर जास्त व्याज दर दिला जातो. या खात्यात तुम्ही किमान २५० रुपये वार्षिक जमा करू शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता.
- सुरूवातीच्या १४ वर्षांसाठी खात्यात तुम्हाला रक्कम जमा करावी लागेल. २१ वर्षांनंतर ही योजना परिपक्व होते. मात्र १८ वर्षांच्या वयानंतर मुलीचे रक्कम झाल्यास ही रक्कम तुम्ही काढू शकता. याशिवाय १८ व्या वर्षांनंतर तुम्ही मुलीच्या शिक्षणासाठी ५० टक्क्यांपर्यंतची रक्कम काढू शकता.
- सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडल्यास आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत दीड लाख रुपयांचा आयकर लाभही मिळतो. तसेच तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम करातून सूट मिळते म्हणजेच करमुक्त परतावा मिळतो.
- नवीन नियमानुसार एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोघींचे खाते उघडण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- खातेदाराला आजार झाल्यास किंला पालकाचा मृत्यू झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.
- खात्यात वर्षात किमान २५० रुपये जमा करणे आवश्यक आहे. ही रक्कम जमा न झाल्यास खाते डिफॉल्ट मानले जाऊ शकते. परंतु नव्या नियमांनुसार खाते पुन्हा सक्रिय न केल्यास मॅच्युरिटी होईपर्यंत खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज मिळत राहील.