एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर आता उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना याबाबत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आपल्या माणसांना मी नको असेन तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ज्या शिवसैनिकांना माझं नेतृत्व नको असेन त्यांनी मला सांगा, मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायलाही तयार आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.
(हेही वाचाः ‘मी माझा मुक्काम ‘वर्षा’वरुन मातोश्रीवर हलवत आहे’, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं)
उद्धव ठाकरे यांचे आवाहन
आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. ज्या शिवसैनिकांना असं वाटत असेल त्यांनी मला येऊन सांगा की, ‘मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नालायक आहे.’, मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. पण हे कोणीही विरोधक किंवा सोशल मीडियावर बोलल्यानंतर त्यांना उत्तर द्यायला मी बांधिल नाही. मी माझ्या शिवसैनिकांना बांधिल आहे. त्यामुळे त्यांनी मला येऊन सांगावं, मी शिवसेना पक्षप्रमुखपदाचा राजीनामा द्यायलाही तयार असल्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.
आताची शिवसेना ही हिंदुत्ववादीच
शिवसेना आणि हिंदुत्व हे दोन घटक एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. शिवसेनेपासून हिंदुत्व कधीही वेगळं होऊ शकत नाही. हिंदुत्वाबाबत महाराष्ट्राच्या विधानसभेत बोलणारा कदाचित मी पहिला मुख्यमंत्री असेन. आताची शिनवसेना ही बाळासाहेबांची राहिली नसल्याची टीका करण्यात येते. पण या शिवसेनेत नेमका फरक काय आहे. 2012 साली बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचे अनेक आमदार-खासदार निवडून आले आहेत. 2014 साली शिवसेनेने स्वतःच्या बळावर 63 आमदार निवडून आणले. त्यामुळे तेव्हाची शिवसेना ही देखील हिंदुत्ववादी असून आताची शिवसेना ही हिंदुत्ववादीच असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः एकनाथ शिंदेंसोबत 35 आमदारांची बंडखोरी, महाविकास आघाडी सरकारचे 101 जीआर!)
Join Our WhatsApp Community