‘मविआ’तून बाहेर पडायला ‘शिवसेना’ तयार, राऊतांंनी सांगितले…

187

गेल्या तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेत सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यादरम्यान, शिवसेना बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. अनैसर्गिक आघाडी नको, असा आग्रह धरणाऱ्या एकनाथ शिंदेंचं हे मत शिवसेना मान्य करायला तयार आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले असून हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान, शिवसेना आमदारांचा आग्रह असेल तर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी असल्याचे राऊत म्हणाले. पण राऊतांनी दर्शविलेल्या या तयारीनंतर त्यांनी एकनाथ शिंदेंसह शिंदेगटासमोर एक अट ठेवली आहे.

(हेही वाचा – “आमच्या विठ्ठलाला…”, राज ठाकरेंप्रमाणेच शिंदे गटाचाही ‘बडव्यां’वर रोष)

दरम्यान, शिवसेनेने मविआतून बाहेर पडले पाहिजे असे वाटतं असेल, तर 24 तासांत मुंबईत या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करा, असे थेट आवाहन संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे यांना केले आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत पुढे असेही म्हणाले की, बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन चर्चा करावी. गुवाहाटीमध्ये बसून पत्रव्यवहार करु नये, असा सल्ला देत इशाराही त्यांनी आमदारांना दिला आहे.

काय म्हणाले राऊत

मविआमधून बाहेर पडावं असं वाटत असेल तर यासाठी आधी मुंबईत या. जे आमदार महाराष्ट्र बाहेर आहेत त्यांनी महाराष्ट्रात यावं. सोशल मीडियातून भूमिका न मांडता प्रत्यक्ष मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंना प्रत्यक्ष भेटून तुमची भूमिका मांडा. तुमच्या भूमिकेचा विचार केला जाईल. आपण पक्के शिवसैनिक आहोत. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे, पण आधी तुम्ही 24 तासात परत या..उद्धव ठाकरेंसोबत बसून भूमिका मांडा, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या वाढतांना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतही शिवसेनेच्या घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत गुरूवारी पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी या संपूर्ण घडामोडींवर भाष्य केले आहे.  यावेळी त्यांनी आमदार आणि पक्ष यात फरक असल्याचे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.