शिवसेनेत कानामागून आलेले आणि तिखट झालेले खासदार संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेची वाट लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांमधून मागील अनेक वर्षांपासून उमटू लागल्यानंतरही राऊत यांचे वजन मागील काही वर्षांत अधिकच वाढूही लागले आहे. राऊत हे शिवसेनेचे नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मानस पुत्र आहे. त्यामुळे ते शिवसेनेला संपवत असल्याच्या प्रतिक्रियेमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरलेली असताना शिवसेनेत आमदार, खासदारांसह झालेल्या मोठ्या बंडानंतर तर राऊत जिंकले आणि शिवसेना हरली अशा प्रतिक्रियाही ऐकायला येवू लागल्या आहे. पवार यांनी राऊतांना हाताशी शिवसेनेला संपवली,अशाही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
( हेही वाचा : तर शिवसेनेच्या आमदारांचे होणार निलंबन )
राऊत यांची भूमिका मूळ निष्ठावान शिवसैनिकांना मान्य नव्हती
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जाणारे आपणच असल्याचे शिवसैनिकांवर बिंबवणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी राज्यात स्थापन झालेल्या शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे आपणच जनक असल्याचे माध्यमांद्वारे दाखवून दिले. महाविकास आघाडी ही आपल्यामुळेच झाल्याचे सांगणाऱ्या राऊत यांचीही भूमिका मूळ निष्ठावान शिवसैनिकांना मान्य नव्हती. जर भाजपशी पटत नसेल तर आपण विरोधी पक्षात बसू पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्तेसाठी तडजोड करत आघाडी करू नये अशी सर्व शिवसैनिकांसह आमदारांची इच्छा होती. परंतु यांनी या महाविकास आघाडी घडवून आणण्यात मोठी जबाबदारी पार पाडली.
राऊत हे शिवसेनेतील व्हिलन
महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वीपासून शिवसैनिकांना राऊत हे शिवसेनेतील व्हिलन वाटत होते. परंतु महाविकास आघाडी आल्यानंतर शिवसेनेवर पूर्ण पकड राऊत यांनी निर्माण केली आणि शिवसेना पक्ष दावणीला बांधल्याप्रमाणे पक्षाला विनाशाकडे घेऊन गेले. त्यामुळे राऊत हे पक्षातील कार्यकर्त्यांसाठी व्हिलन वाटत असतानाच पवारांसोबत असलेले नातेही पक्षाला खड्ड्यात घालणार अशाही संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांमधून उमटत होत्या. एवढेच नाही तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत संजय राऊत यांचा समाचार घेताना, पवार आज संजय राऊतांवर खूश आहेत, पण उद्या त्यांना कधी टांगतील हेही कळणार नाही,अशा प्रकारची टिका केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या टिकेमागील गांर्भिय आता लोकांना कळू लागले असून राऊतांचा वापर करत पवार यांनी शिवसेनेला डॅमेज कंट्रोलमध्ये आणून ठेवल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरीनंतर खऱ्या अर्थाने संजय राऊत खूश झाले असतील आणि शिवसेना हरली आणि शरद पवार हे जिंकले,अशाप्रकारच्या प्रतिक्रिया लोकांमधून ऐकायला येवू लागल्या आहेत.
Join Our WhatsApp Community