अखेर ‘अकेला’ फडणवीसांनी पवारांना धोबीपछाड केलंच

129

धर्मवीर अशी ख्याती असलेले आनंद दिघे यांचे पट्टशिष्य एकनाथराव शिंदे यांनी अचानक बंड केलं आणि मविआ सरकार अस्वस्थ झालं. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माननीय उद्धव ठाकरे हे जरी वरवर मुख्यमंत्री दिसत असले तरी ते केवळ नामधारी आहेत. खरे मुख्यमंत्री हे शरद पवार आहेत. गेली अडीच वर्षे पवार सत्ता राबवत होते आणि मुख्यमंत्री केवळ सह्या करत होते. नाइलाजाने तेवढे कष्ट घेण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता.

खरं पाहता, २०१९ साली महाराष्ट्राच्या बहुसंख्य जनतेने देवेंद्र फडणवीस यांना सत्ता सोपवली होती. युतीला भरघोस मतांनी विजयी केलं होतं. पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायची घाई लागली असल्याने शरद पवारांनी डाव साधला. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची आयती संधी त्यांच्याकडे चालून आली. यात शिवसेनेकडून संजय राऊतांनी पुढाकार घेतला आणि ‘मी पुन्हा येईन’ या देवेंद्र फडणवीसांच्या वाक्याची खिल्ली उडवली गेली.

आता त्या गोष्टीला अडीच वर्षे होऊन गेलेली आहेत. या दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीचे पुराव्यासकट अक्षरशः वाभाडे काढले. हे सरकार कसं नालायक आहे हे संवैधानिक पद्धतीने दाखवून दिलं. फडणवीसांची खरी लढाई ही उद्धव ठाकरे किंवा विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्या सोबत नव्हतीच. फडणवीसांसमोर हे दोघेही खूप सामान्य नेते आहेत. त्यांची लढाई होती ती मातब्बर शरद पवारांसोबत.

म्हणूनच एकनाथ शिंदे फुटले आणि शिवसेना आमदारांना घेऊन सुरतला गेले. हा धक्का उद्धव ठाकरेंसाठी नव्हताच. कारण या गोष्टी उद्धव ठाकरेंना कळण्यासारख्या नव्हत्याच, इतके ते राजकीयदृष्ट्या पुढारलेले नाहीत. हा धक्का शरद पवारांसाठी होता. गंमत म्हणजे पोलिसांच्या संरक्षणांतर्गत हे आमदार सुरतला पोहोचल्याची बातमी प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे फडणवीसांना पोलिसांचा देखील पाठिंबा आहे आण सध्या सत्ता आहे म्हणून नाईलाजाने शरद पवारांचं ऐकावं लागत आहे हे स्पष्ट झालेलं आहे.

शरद पवारांना देवेंद्र फडणवीस याचसाठी नको होते, कारण फडणवीस त्यांच्या ताटाखालचं मांजर होऊ शकत नाहीत. फडणवीसांचं एक वेगळ स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यांची वेगळी शैली आहे, पवारांपेक्षा अनुभव कमी असला तरी ते पवारांपेक्षा कमी मुळीच नाहीत. उलट या खेळीने त्यांनी पवारांना धोबीपछाड करुन टाकलेलं आहे. शिंदेंच्या बंडानंतर पवारांना काय करावं हे समजत नव्हतं. इतके पवार हतबल झाले आहेत.

अकेला फडणवीस क्या करेगा हे वाक्य खूप गाजलं. अकेला फडणवीस क्या क्या कर सकता है याची चर्चा सध्या पवारांच्या गोटात सुरु झाली असेल. सत्ता वाचवण्याची केवीलवाणी धडपड सध्या सुरु आहे. सत्ता जाणार हे माहित असल्यामुळेच गेल्या २ दिवसात जास्तीत जास्त जीआर काढले गेले. आता एकनाथ रावांचं बड यशस्वी होईल असं दिसतंय, पण वादापुरतं आपण असं समजूया की त्यांचं बंड यशस्वी झालं नाही, तरी फडणवीसांनी पवारांना चांगलीच धावपळ करायला लावलेली आहे. आणि हे बंड यशस्वी झालं तर उठता बसता पवारांमुळेच सगळं घडतं हे म्हणण्याची प्रथा महाराष्ट्रातून नष्ट होईल, असं म्हणायला हरकत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.