राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले आहे. भाजप अखेर आता राजकीय घडामोडींमध्ये उतरल्याचे दिसून येत आहे. राज्यातल्या परिस्थितीत हस्तक्षेप करा, अशी मागणी भाजपने पत्राद्वारे केली आहे.
राज्यपालांनी हस्तक्षेप करावा
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहित, म्हटले आहे की राज्यातील अस्थिर परिस्थिती पाहता यात हस्तक्षेप करावा. राज्यात नवनवीन जीआर काढले जात आहेत. तत्काळ निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे राज्यपालांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालावे.
राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत मा. राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारीजी यांना आज पाठविलेले पत्र. @BSKoshyari @maha_governor pic.twitter.com/oJ7YG3QSmp
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 24, 2022
( हेही वाचा: शिंदे गटाला मोठा झटका! गटनेतेपदी अजय चौधरी तर प्रतोदपदावर सुनील प्रभूंची निवड )
अनेक बदल्या होण्यााच्या शक्यता
30 जूनपर्यंत बदल्या केल्या जाऊ नयेत, असे आदेश उद्धव ठाकरे सरकारनेच दिले होते. पण आता मात्र सरकार अस्थिर असताना, अनेक जीआर काढले जात आहेत. पोलीस दलांत अनेक बदल्या होण्याच्या शक्यता आहेत. वेगवेगळ्या योजनांसाठी निधी वितरित केला जात आहे. या सगळ्या गोष्टींमागे अर्थकारण असते आणि म्हणूनच विरोधी पक्षनेत्यांनी या संदर्भात लक्ष घालण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे.
पत्रातील महत्वाचे मुद्दे
- गेल्या दोन दिवसांत घेतलेले निर्णय रद्द करण्याची मागणी
- गेल्या 48 तासांत 160 च्यावर आदेश काढल्याचा दावा
काय लिहिलेय पत्रात
राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णयसपाटा राबवला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. 160 च्या वर शासन आदेश 48 तासांत जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढवणारा आहे. अडीच वर्ष निर्णयशून्य असलेले महाविकास सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे. पोलीस दल व अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा सुद्धा घाट घातला जात आहे. यापूर्वी पोलीस दलांत झालेल्या महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच जेलमध्ये जावे लागले आहे. महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, असे दरेकर यांनी या पत्रात लिहिले आहे.
Join Our WhatsApp Community