एकनाथ शिंदे यांच्यासह फुटलेल्या आमदारांच्या विरोधात विभागात फलकबाजी करत आंदोलन करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून केला जात आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुखांसमोर आपली निष्ठा सिध्द करण्यासाठी ही आंदोलने केली जात असली तरी स्थानिक वैमनस्यातूनच हे आंदोलन केले जात आहे. त्यामुळे आंदोलनकर्ते आणि त्यांचे नेतृत्व करणारे आता फुटलेल्या आमदारांच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. फुटलेले आमदार कुठल्याही अन्य पक्षात सामील झालेले नसून शिवसेनेचा वेगळा गट स्थापन करुन आहेत. त्यामुळे या गटाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाल्यानंतर या सर्व आंदोलनकर्त्या शिवसैनिकांचा समाचार घेतला जाणार असल्याचे, बोलले जात आहे.
शिवसेनेच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत एकूण ५५ आमदारांपैकी ३८ आमदारांचा फुटून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गट स्थापन झाला. या पक्षातील बंडखोरीनंतर स्थानिक पातळीवर शिवसैनिकांनी आपल्या आमदाराविरोधात आंदोलन करत त्यांच्या नावाचे गद्दार म्हणून विभागात बॅनरबाजी केली. तर काही ठिकाणी त्यांच्या फलकांवरील नावाला काळे फासणे आणि त्यांचे पुतळे जाळणे असे प्रकार घडले.
गद्दार लिहून बॅनरबाजी
या फुटलेल्या ३८ आमदारांपैंकी मागाठण्याचे आमदार प्रकाश सुर्वे, भायखळ्यातील आमदार यामिनी जाधव, दादर माहिमचे आमदार सदा सरवणकर आणि कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर आदींचा समावेश आहे. दहिसरमध्ये शिवसैनिकांनी प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात मोर्चा काढून निषेध नोंदवला, तर दादर माहिममध्ये शिवसैनिकांनी सदा सरवणकर यांच्या शाखेवरील नावाच्या पाटीला काळे फासत आंदोलन केले. अन्य भायखळा आणि कुर्ल्यांत आमदारांच्या फोटोखाली गद्दार असे लिहून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
आंदोलनकर्ते चेहरे आमदारांच्या रडारवर
हे सर्व आंदोलन आगामी निवडणुकीकरता तिकीट मिळवण्यासाठी केवळ पक्षप्रमुखांना निष्ठा दाखवण्याकरताच केले जात असून, प्रत्येक विभागात आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद आहेत. अशाप्रकारे वाद असणारे पदाधिकारीच आता अशा आंदोलनात पुढे दिसत आहेत. त्यामुळे विभागातील दुश्मनी काढण्यासाठी आंदोलनाचा वापर केला जात आहे. यामध्ये आमदारांना आणि शिवसेनेला मानणारा शिवसैनिक दिसत नाही. विशेष म्हणजे यासर्व आंदोलनात नेमकेच चेहरे दिसत असल्याने, आता या आंदोलनाचे नेतृत्व करणारे चेहरेच या आमदारांच्या रडावर असल्याचे बोलले जात आहे.
वैद्य आणि राऊत यांचे पटत नाही
दादर माहिममध्ये आंदोलन करण्यात मिलिंद वैद्य आघाडीवर होते. परंतु वैद्य आणि सभागृहनेत्या विशाखा राऊत यांचे सदा सरवणकर यांच्याशी पटत नाही. यापूर्वी सदा सरवणकर यांनी अशाचप्रकारे पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर, पक्षाने मिलिंद वैद्य यांना विभागप्रमुख बनवले होते, परंतु सरवणकर पुन्हा पक्षात आल्यानंतर वैदय यांच्याकडील विभागप्रमुखपद काढून पुन्हा त्यांच्याकडे सोपवले होते. वैद्य आणि राऊत हे मनोहर जोशी समर्थक मानले जात आहेत. आणि जोशी यांनीच सदा सरवणकर यांचा पत्ता २००९च्या निवडणुकीत कापला होता आणि तेव्हापासून यांच्यात वादाची ठिणगी पडलेली आहे.
सरकार आल्यावर यांचा समाचार घेऊ
यातील काही फुटलेल्या आमदारांच्या मते, आम्ही फुटलो तरी शिवसैनिकच आहोत आणि शिवसेनेचा स्वतंत्र गट करून राहिलेलो आहोत. आम्ही कुठल्याही पक्षात सामील झालेलो नाहीत. विभागात जे लोक आमच्या विरोधात आंदोलन करत आहेत, ते केवळ आमच्या विरोधातील दुश्मनी काढत आहेत. यात विभागातील प्रामाणिक शिवसैनिक नसून उध्दव ठाकरे यांच्यासमोर निष्ठा दाखवून देण्यासाठी ते आमच्या विरोधात अशाप्रकारे आंदोलन करत आहेत. परंतु जी मंडळी आज आंदोलन करत आहेत, त्यांनी लक्षात ठेवावे, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही शिवसेनेचेच आहोत आणि सरकार आल्यानंतर यासर्वांचा निश्चितच समाचार घेतला जाईल,असे इशारा आता आमदारांनी आपल्या समर्थकांमार्फत विभागात पोहोचवण्यास सुरुवात केली आहे.
( हेही वाचा: राज्यातल्या परिस्थितीत हस्तक्षेप करा; भाजपची राज्यपालांकडे मागणी )
जशास तसे उत्तर मिळणार
आज ज्या अर्थी ३८ आणि अपक्षांसह ४८ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत उभे राहतात, यावरून शिवसेनेच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलो असतो तर गद्दार म्हटले तर चालेल, पण आम्ही स्वतंत्र गट निर्माण करून शिवसेनेसोबतच असताना, असे आंदोलन करत एकप्रकारे शिवसैनिकांमध्ये चुकीचा संदेश पसरवला जात आहे. त्यामुळे जर आंदोलनकर्त्यांना वाटत असेल की आम्हीच शिवसैनिक आहोत आणि आम्हालाच आंदोलन करता येते, तर आम्हीही त्याच मुशीतील असून जशास तसे उत्तर आम्हालाही देता येते, हेही त्या आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी लक्षात ठेवावे असाही इशारा आमदारांनी समर्थकांमार्फत देण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community