पर्यावरणपूरक आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहनधारकांना चार्जिंगची सुविधा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी महावितरणाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंक स्टेशन सुरू करण्यात आली आहेत. ठाण्यात ५, नवी मुंबईत २, पुणे ५ आणि नागपूरमध्ये १ स्टेशन सुरू करण्यात आली आहे.
यासह राज्यभरात विविध ठिकाणी २ हजार ३७५ स्टेशन प्रस्तावित आहेत. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक चार्जिंग इकोसिस्टीम सक्षम करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला परवान्याशिवाय सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची परवानगी दिली आहे. आता महामार्गाच्या बाजूला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनही उभारण्यात येत आहेत. राज्य शासनाने चार्जिंग पायाभूत सुविधा पुरवण्याकरता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. खासगी व्यक्तींना चार्जिंग स्टेशन उभारायचे असल्यास त्यांना महावितरणतर्फे प्राधान्याने वीजपुरवठा करण्यात येत आहे.
(हेही वाचा – शिंदे गटाच्या आमदारांचे प्रतिज्ञापत्र आणि व्हिडिओ विधानसभा उपाध्यक्षांना होणार सादर)
महावितरणाने आपल्या उपकेंद्रातील अतिरिक्त जागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वखर्चाने चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले आहे. महावितरणातर्फे प्रस्तावित अतिरिक्त ४९ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची कामे प्रगतिपथावर सुरू आहे. यामध्ये नवी मुंबई १०, ठाणे ६, नाशिक २, औरंगाबाद २, पुणे १७, सोलापूर २, नागपूर ६, कोल्हापूर २, अमरावती २ इत्यादींचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community