पावसाळ्यानंतर मुंबईतील अनेक उड्डाणपुलाचे सौंदर्य खुलणार आहे. मुंबईतील अनेक उड्डाण पुलाच्या डागडुजीसह आकर्षक रंगरंगोटी केली जाणार आहे. उड्डाण पुलावर भित्तीचित्रांच्या माध्यमातून वेगळा साज चढण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मुंबईचे रूप खुलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एख भाग म्हणून या पुलांचा मेकओव्हर करण्यात येणार आहे. मुंबईतील अनेक रहदारीच्या पुलांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे पालिकेने उड्डाणपुलांखालील जागेची रंगरंगोटी करून, त्यावर चित्र रेखाटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४ कोटी ७३ लाख रूपये खर्च करण्यात येणार आहेत.
(हेही वाचा- राणेंनी शरद पवारांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचे चंद्रकांत पाटलांकडून समर्थन)
मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने उड्डाणपुलाखालील भिंतींना रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भिंतीचित्रेही काढण्यात येणार आहेत. सुरूवातीच्या टप्प्यांत मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील ३२ उड्डाणपुलांना रंगरंगोटी करण्यात येणार आहे.
कोणत्या पुलांचा होणार मेकओव्हर
- प्रिन्सेस स्ट्रीट मरीन ड्राईव्ह पूल
- केम्स कॉर्नल
- प्रियदर्शनी पूल
- फ्रेंच पूल
- ऑपेरा हाऊस
- ग्रँट रोड पूल
- केनडी पूल
- सीताराम सेलम
- रे रोड पूल
- सायन हॉस्पिटल पूल
- करी रोड
- केशव सूत-दादर
- महालक्ष्मी पूल
- कॅरोल एल्फिन्स्टन
- लोअर परेल
या पुलांसह अन्य पादचारी पुलांचा समावेश आहे. १८ महिन्यांत या सर्व पुलांच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या पूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.