सध्या सर्वत्र हेडफोन वापराचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. मोबाइलला ब्लू-टूथद्वारे हेडफोन कनेक्ट केला की आजूबाजूचे भान विसरून कशाचाच आवाज ऐकू येत नसल्याने त्या आवाजाकडेच आपले मन तल्लीन होते. मात्र, या हेडफोनच्या अतिवापरामुळे बहिरेपण येण्याची शक्यता असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. त्यामुळे तुम्हाला देखील सतत हेडफोन लावण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा…
कोणी केले संशोधन ?
मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ केअर अँड मेडिकल इन्स्टिट्यूट यांनी संशोधन केले. १८ ते ७५ या वयोगटातील १,८६,४६० फ्रेंच लोकांवर हे संशोधन करण्यात आले आहे. यावेळी या संशोधनात असे आढळले की, चारपैकी एका व्यक्तीची ऐकण्याची क्षमता कमी होत चालली आहे. थोडक्यात म्हणजे याचाच अर्थ फ्रान्समधील २५% लोकसंख्येची वाटचाल हळूहळू बहिरेपणाकडे सुरू झाल्याचे समोर आले आहे.
संशोधनातून काय आले समोर
संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षातून असे लक्षात येत आहे की, बदलती जीवनशैली, वाढता एकटेपणा आणि नैराश्य यांमुळे ऐकण्याची क्षमता कमी होत चालली आहे. हेडफोनचा वापर सातत्याने वाढत चालल्यानेही व्यक्तीच्या कानाच्या पडद्यांवर परिणाम होत आहे. निष्कर्षातून पुढे असेही समोर आले की, २०५० पर्यंत जगभरातील २५० कोटी लोकांना बहिरेपण येण्याची शक्यता आहे. यासह १५० कोटी लोकांना काही प्रमाणात श्रवणदोष असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही म्हटले असून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
Join Our WhatsApp Community