झारखंडच्या माजी राज्यपाल भाजपप्रणीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी आज, शुक्रवारी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीं, पियूष गोयल, अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोदींच्या उपस्थितीत एनडीएने जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले.
संधी दिल्याबद्दल मानले मोदींचे आभार
आदिवासी समाजातून आलेल्या त्या पहिल्या महिला नेत्या आहेत ज्या भारताच्या सर्वोच्चपदाची निवडणूक लढवत आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जातील पहिले प्रस्तावक मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकन पत्रावर स्वाक्षरी करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानत ट्विट केले आहे.
https://twitter.com/DraupdiMurmuBJP/status/1539887497899032578
मुर्मू यांच्या नामनिर्देशन पत्रावर प्रस्तावक आणि समर्थक म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी स्वाक्षरी करण्यात आली आहे. द्रौपदी मुर्मू यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या पक्षाचे राज्यसभा खासदार विजय साई रेड्डी आणि पक्षाचे लोकसभेतील नेते मिधुन रेड्डी उपस्थित होते.
कोण आहे द्रौपदी मुर्मू?
- द्रौपदी मुर्मू ओडिशा येथील आदिवासी समाजाचे नेतृत्व करतात.
- द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या सर्वाधिक काळ राज्यपाल राहिल्या आहेत.
- देशातील पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल आहेत.
- ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात राहणाऱ्या द्रौपदी मुर्मू या दोनदा रायरंगपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा आमदार होत्या.
- भाजपा आणि बीजू जनता दलाच्या सरकारमध्ये त्या मंत्री होत्या.