‘जे माझे नव्हतेच त्यांच्यासाठी मला वाईट का वाटावं?’, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांबाबत संताप

222

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राज्यातील राजकीय परिस्थिती फार अस्थिर झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केल्यानंतर शुक्रवारी त्यांनी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.

महत्वाकांक्षा असावी पण ती कधीही राक्षसी असू नये. ज्याने खायला दिलं त्यालाच खायचं ही महत्वाकांक्षा असू शकत नाही. तुम्हाला अजून कोणाला न्यायचं असेल तर न्या. तुम्ही झाडाच्या फांद्या आणि फुलं नेऊ शकता पण बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी जोडलेली मूळ जोपर्यंत शिवसेनेसोबत आहेत तोपर्यंत शिवसेनेला कुठलाही धोका नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जे माझे नव्हते ते मला सोडून गेलेत त्यांच्यासाठी मला वाईट का वाटावं. ही जी माणसं मोठी झाली त्यांची स्वप्न मोठी होतात, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी मला जबाबदारी दिलेली नाही तर सर्व शिवसैनिकांची स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी माझ्यावर आहे.

शिवसेना चालवून दाखवाच

आता बाळासाहेबांची शिवसेना संपली आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळी आहे, त्यांची शिवसेना वेगळी आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पण ठाकरे आणि शिवसेना ही दोन नावं वेगळे करुन तुम्ही शिवसेना चालवून दाखवाच. माझा फोटो लावूच नका, पण बाळासाहेबांचाही फोटो न लावता तुम्ही शिवसेना नावाने जगून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले आहे.

मग मंत्रीपदं का नाही नाकारली?

ज्या शिवसैनिकांनी तुम्हाला मतदान केलं त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही निवडून आलात, तीच शिवसेना आता बाळासाहेबांची नाही असं तुम्ही सांगत आहात. 2012 नंतर मिळालेली मंत्रीपदं तुम्हाला कोणत्या शिवसेनेने दिली?, मग ती मंत्रीपदं जर बाळासाहेबांच्या शिवसेनेने दिली नव्हती तर मग ती तुम्ही का नाही नाकारली?, असे सवाल उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले आहेत.

वर्षा सोडला पण…

फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मी बोललो आणि मी वर्षा सोडून मातोश्रीवर आलो. त्यामुळे मला अनेकांनी फोन करुन सांगितलं की तुम्ही वर्षा सोडायला नको होतं कारण लोकांना असं वाटत आहे की तुम्ही जिद्द सोडली. पण मी जिद्द सोडलेली नाही, मी मोह सोडला आहे. जिद्द कधीच सोडणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. स्वप्नातसुद्धा मला वाटलं नव्हतं की मुख्यमंत्रीपद भूषवेन ते मला मिळालं. त्यामुळे या पदाचा मला मोह नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.