मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरण क्षेत्रामध्ये पावसाने पाठ फिरवल्याने पाणी साठ्यात घट होऊ लागली आहे. तलाव क्षेत्रात पावसाअभावी कमी झालेल्या पाणी साठ्यामुळे मुंबईकरांवर जलसंकट ओढवलेले असून पुढील वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करण्याच्यादृष्टीकोनातून येत्या सोमवारपासून अर्थात २७ जून २०२२पासून १० टक्के पाणीकपात करण्यात येत आहे. महापालिकेच्या जलअभियंता विभागाने कपात करण्यात येत असल्याचे शुक्रवारी जारी केले आहे.
(हेही वाचा : मुंबईकरांनो, पाणी कपातीला व्हा तयार, तलाव साठा केवळ १० टक्केच!)
७० टक्के कमी पावसाची नोंद
यंदाचा पावसाळा सुरू होऊन जून महिना उलटत आला तरी तलाव क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडत असून जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरीपेक्षा सुमारे ७० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयामध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत शुक्रवारी या सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त १ लाख ४१ हजार ३८७ दशलक्ष लिटर म्हणजे ९.७७ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवशी हा जलसाठा १५.५४ टक्के इतका होता. त्यामुळे मागील दोन वर्षांच्या तुलनेत सर्वांत कमी पाणी साठा असल्याचे दिसून येत आहे.
१० टक्के कपात लागू
दमदार पावसाअभावी हीच परिस्थिती यापुढेही सुरू राहिल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, दमदार पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आवश्यक पाणी साठ्याची स्थिती सुधारेपर्यंत,मुंबइइत सोमवार दिनांक २७ जून २०२२ पासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे.मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना जेवढा पाणीपुरवठा केला जातो, त्यामध्येही १० टक्के कपात लागू राहणार आहे.
दमदार पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता दैनंदिन पाणी वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा व महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन महापालिका प्रशासनाने केला आहे.
Join Our WhatsApp Community