गणपती उत्सवासाठी ‘लालपरी’ सज्ज! एसटी महामंडळ कोकणात सोडणार २५०० गाड्या; २५ जूनपासून आरक्षण सुरू

160

३१ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १३०० बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून २५ जूनपासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. तर ५ जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. कोकणात जाणाऱ्या जास्तीत जास्त चाकरमान्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही परब यांनी केले.

( हेही वाचा : मध्य रेल्वेवर सलग दोन दिवस मेगाब्लॉक!)

एसटी महामंडळ सज्ज

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे २५०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असे अनिल परब यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान या गाड्या कोकणात रवाना होतील. तर ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला निघतील. या बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेत स्थळावर, मोबाईल ॲपव्दारे, खाजगी बुकींग एजंट व त्यांच्या ॲपवर उपलब्ध होणार आहे, असेही परब यांनी सांगितले.

( हेही वाचा : कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश! १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता)

कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.