शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आता शिवसैनिक राज्यातील बंडखोर आमदारांच्या घरांना टार्गेट करू लागले आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी मुंबईत कलम १४४ लागू केला आहे. पुढची १५ दिवस मुंबईत जमाव बंदी लागू केली आहे.
आमदारांच्या घरांना संरक्षण
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ३५ आमदारांना घेऊन बंडखोरी केली. त्यानंतर मुंबईसह राज्यभरातील बंडखोर शिवसेना आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांचा असंतोष निर्माण झाला आहे. शुक्रवारी, २४ जून रोजी शिवसैनिकांनी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावरील बोर्ड फोडला. तर शनिवारी, २५ जून रोजी आमदार तानाजी सावंत यांच्या कारखान्यावर हल्ला केला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला केला. या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले. तसेच आमच्या गटातील आमदारांच्या कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी ही सरकारची आहे. आमच्या कुटुंबाला काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदार सरकारची असेल, असे पत्रात म्हटले आहे. त्यावर तातडीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक घेतली आहे. त्या बैठकीत तातडीने आमदारांच्या घरांना संरक्षण देण्यात आले. त्याच बरोबर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी तातडीने बैठक घेतली, त्या बैठकीत मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे लग्न समारंभ, अंत्ययात्रा वगळता कुणालाही मोठ्या संख्येने जमाव निर्माण करण्यात प्रतिबंध करण्यात आला आहे.
(हेही वाचा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ऑफिसवर दगडफेक)
Join Our WhatsApp Community