BKC प्रवाशांचं ‘बेस्ट’ प्रशासनाला साकडं! बसच्या वाढीव फेऱ्यांची मागणी

158

वांद्रे कुर्ला संकुल परिसरात अनेक मोठमोठी खासगी कार्यालये आहेत. बीकेसीतील बस थांब्यावर सायंकाळी लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. बसथांब्यावर अर्धा तास वाट पहावी लागते, त्यानंतर बसमधून प्रचंड गर्दीतून प्रवास करण्याची वेळ येथील प्रवाशांवर येते. अन्यथा, बस वेळेत न मिळाल्यास वांद्रे किंवा कुर्ला स्थानकापर्यंत चालत जावे लागते. सकाळी ८.३० ते सकाळी ११.३० आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत वांद्रे स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. बीकेसीतील आर्थिक केंद्रात रोज हजारो कर्मचारी येतात. वांद्रे किंवा कुर्ला स्थानकावर उतरून हे कर्मचारी पुढील प्रवास रिक्षा किंवा बसने करतात. याविषयी ट्विटरवर बेस्ट उपक्रमाला टॅग करत अनेक प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया देऊन आमच्या समस्यांची दखल घेण्याची मागणी केली आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ बस थांब्यांजवळ आता प्रवाशांना मिळणार ‘इलेक्ट्रिक बाईक’ सेवा)

बसने फक्त ५ रुपयात प्रवास 

ऑफिसच्या वेळेमध्ये बससाठी रांगाच रांगा लागल्याचे चित्र असते. स्टेशनसमोरील अरुंद जागेत रिक्षाही येत असतात, त्यामुळे वाहनांची कोंडी असते. या कोंडीतून बाहेर जाण्यासाठी बसला अर्धा तास लागतो. सायंकाळच्यावेळी बीकेसी डायमंड मार्केट परिसरात सुद्धा अशीच गर्दी पुन्हा रेल्वे स्थानक गाठण्यासाठी होते. वांद्रे स्थानक ते बीकेसी या अंतरासाठी रिक्षाचालक प्रत्येकी २०-३० रुपये घेतात, बसने मात्र हाच प्रवास ५ रुपयांमध्ये होतो. त्यामुळे रिक्षाचालक सुद्धा स्थानक परिसरात गर्दी करून वाहतूककोंडी करतात. त्यामुळे या रिक्षाचालकांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा अनेक वांद्रे पूर्व येथील रहिवासी आणि बीकेसीमधील कर्मचारी करत आहेत.

ट्विटरद्वारे प्रवाशांची मागणी 

यासंदर्भात ट्विटरवर सुद्धा प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने हा आमचा दैनंदिन struggle आहे असे ट्वीट केले आहे तर दुसऱ्या एका युजरने बीकेसीमध्ये गर्दीच्या वेळी कुर्ला आगारातून बसेस का सोडल्या जात नाहीत असा सवाल केला आहे. कृपया BKC प्रवाशांना मदत करण्यासाठी धारावी/कुर्ला डेपोच्या बसेस पुन्हा मार्गी लावा अशी विनंती या युजरने केली आहे. तर कामावरून सुटल्यावर बसची वाट पाहण्यात १ ते २ तास निघून जातात त्यामुळे त्रास होत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.