शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचा मुक्काम वाढल्याची माहिती मिळतेय. शिंदे गटाते बंडखोर आमदार आणि शिवसेना यांच्या सत्तासंघर्षांचा पेच काही सुटता सुटत नाहीये. आज सहावा दिवस असून याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. गुजरातमध्ये शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेट झाली. या भेटीमध्ये नेमकं काय झालं, याची माहिती अद्याप समजू शकली नाही. दरम्यान, शिंदे गटाने गुवाहाटीतील मुक्काम ३० जूनपर्यंत वाढवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
(हेही वाचा – शिवसैनिकांनो, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा! एकनाथ शिंदेंचे आवाहन)
आदित्यच्या युवा सेनेवरच शिवसेनेची मदार
दरम्यान, शिंदे गटाने भाजपसोबत पुन्हा युती करण्याचा सल्ला दिला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील सत्तेसाठी चाचपणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पण भाजपकडून सावधेतेने पवित्रा घेऊन सत्तेची गणितं जुळवली जात असल्याचे म्हटले जात आहे. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उध्दव ठाकरे यांच्या मुळमुळीत धोरणामुळे बाळासाहेबांचे शिवसैनिक आणि उध्दव ठाकरे यांचे समर्थक असे दोन गट पडले असून त्यातूनच झालेल्या युवा सेनेच्या जन्मानंतर शाखाशाखांमधून जुन्या शिवसैनिकांसमोरच युवा सैनिकांचे आव्हान निर्माण झाले. त्यामुळे फुटलेल्या शिवसेनेनंतर जुन्या शिवसैनिकांवर अवलंबून न राहता आता आदित्यच्या युवा सेनेवरच शिवसेनेची मदार राहणार आहे.
सेनेच्या मदतीने शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणार
एकनाथ शिंदे यांनी ४० ते ४५ आमदारांना फोडून शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर आता उध्दव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांचे जुन्या शिवसैनिकांवरील विश्वास उडाला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेत बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक असल्याने भविष्यात आपला समर्थक शिवसैनिक तयार करण्यासाठी युवा सेनेची स्थापना करण्यात आली होती. आज शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर याच युवा सेनेवर शिवसेनेची मदार असून युवा सैनिकांच्या मदतीने शिवसेनेची पुढील वाटचाल केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ज्या दृष्टीकोनातून युवा सेनेची स्थापना केली होती, त्याच आदित्य ठाकरेंची सेनेच्या मदतीने शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणार असल्याचा विश्वास उध्दव व आदित्य ठाकरे यांना असल्याचेही बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community