पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये आणीबाणी आठवण करत त्यांनी आणीबाणी ही भारताच्या इतिहासातील ‘काळा अध्याय’ आहे, असे वर्णन केले आणि सांगितले की, ही आमची लोकशाही मानसिकता असल्याने आणीबाणीच्या आखेरीस मजबूत विजय झाला, असे मोदींनी मन की बातच्या 90 व्या भागाच्या सुरुवातीला सांगितले.
आजच्या पिढीतील तरुणांना हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांच्या पालकांचा जगण्याचा अधिकार त्यांच्या तारुण्यातच हिरावून घेण्यात आला होता. 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली. यामध्ये देशातील नागरिकांकडून सर्व अधिकार काढून घेण्यात आले. त्यावेळी कलम 21 रद्द करण्यात आले होते. त्यावेळी भारतातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न झाला होता.
लोकशाहीच्या भावनेचा अखेर विजय
त्यावेळी भारताच्या लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न झाला होता, असे ते म्हणाले. देशाची न्यायालये, प्रत्येक घटनात्मक संस्था, प्रेस या सर्वांवर नियंत्रण होते. सेन्सॉरशिपची अशी स्थिती होती की मंजुरीशिवाय काहीही छापता येत नाही. यावेळी पंतप्रधानांनी प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्यावर घातलेल्या बंदीचाही उल्लेख केला. ते पुढे असेही म्हणाले, “अनेक प्रयत्न, हजारो अटकेनंतर आणि लाखो लोकांवर अत्याचार करूनही भारतातील लोकांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत झालेला नाही. आपल्या भारतात शतकानुशतके लोकशाहीची मूल्ये जोपासली जात आहेत. आपल्या शिरपेचात असलेल्या लोकशाहीच्या भावनेचा अखेर विजय होतो.
हुकूमशाही मानसिकतेला लोकशाही मार्गाने केले पराभूत
पंतप्रधान म्हणाले की, भारतातील जनतेने लोकशाही मार्गाने आणीबाणी हटवून लोकशाही प्रस्थापित केली. हुकूमशाही मानसिकतेला लोकशाही मार्गाने पराभूत करण्याचे असे उदाहरण संपूर्ण जगात सापडणे कठीण आहे. आपला वैयक्तिक अनुभव सांगताना मोदी म्हणाले की, आणीबाणीच्या काळात लोकशाहीचा सैनिक या नात्याने देशवासीयांच्या संघर्षाचे साक्षीदार होण्याचा बहुमानही मला मिळाला.
Join Our WhatsApp Community