बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तब्बल तेरा वर्षांनी नव्या वाघाच्या बछड्याच्या आगमनाची उद्यान प्रशासनाला आतुरता लागली आहे. गेल्या आठवड्यापासून उद्यानातील बाजीराव (8 वर्ष) आणि श्रीवल्ली (अडीच वर्ष) या वाघ-वाघिणीच्या जोडीचे उद्यानातील पिंजाऱ्यात मिलन होत असल्याने उद्यानात गोड बातमी कधी मिळते याची उत्सुकता उद्यान प्रशासनाला लागली आहे.
जोडी जमली रे…
दोन्ही वाघ-वाघीण विदर्भातील चंद्रपूरातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले गेले होते. माणसांवर हल्ला केल्याने दोघांनाही जेरबंद करून, त्यांची रवानगी येथे केली गेली. बाजीराव दोन वर्षांपूर्वी तर श्रीवल्लीला यंदाच्या वर्षात मार्च महिन्यात उद्यानात आणले गेले. तीन महिन्यांत श्रीवल्लीला उद्यानातील वातावरणात रुळू दिल्यानंतर बाजीरावसह तिची जोडी जमवण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला. आतापर्यंत किमान 30 वेळा त्यांचे मिलन झाल्याची माहिती सूत्रांकडून दिली गेली आहे.
(हेही वाचाः राधानगरीत आगमन झालेला वाघ मातीतंच जन्मलेला)
नव्या पाहुण्याची प्रतिक्षा
मिलन यशस्वी झाले असल्यास येत्या तीन महिन्यांत उद्यानात नवा बछडा जन्माला येईल, अशी आशा उद्यान प्रशासनाला आहे. 2009 साली लक्ष्मी, आनंद ही भावंडे उद्यानात जन्माला आली होती. त्यानंतर 2017 साली बिजली आणि मस्तानी या बहिणींना उद्यानातील यश आणि आनंद हे जोडीदार दिले गेले होते. जोड्या एकमेकांमध्ये बदलूनही हे वाघ-वाघिणीचे मिलन अयशस्वी ठरले. त्यानंतर अद्यापही उद्यानात नवा वाघ जन्माला आला नाही. आता श्रीवल्ली आणि बाजीरावकडून उद्यान प्रशासनाला नव्या पाहुण्याची आशा आहे.
(हेही वाचाः नॅशनल पार्कातील वाघाटीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी)
Join Our WhatsApp Community