महिलांनो, गर्भधारणेच्या समस्येत तुम्हाला अडचणी येत आहेत का? तुम्हाला स्वतःच्या तब्येतीची, खाण्या-पिण्याच्या आरोग्यदायी सवयींसह मासिक पाळीच्या दिवसांत वेळेवर सॅनिटरी नॅपकिनही बदलण्याची सवय बाळगण्याचा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञ देत आहेत. वेळेवर सॅनिटरी नॅपकिन बदलण्याची सवय नसेल तर कित्येकदा अंतर्गत अवयवांत संसर्ग होत गर्भधारणेत समस्या किंवा सुरुवातीलाच गर्भपात होण्याची भीती स्त्रीरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली.
संसर्ग होण्याची भीती
वाढत्या जनजागृतीमुळे मासिक पाळीच्या दिवसांत आता महिलावर्गाकडून सॅनिटरी नॅपकिन्स प्रामुख्याने वापरले जातात. मात्र कित्येकदा सॅनिटरी नॅपकिन्सच्या किंमतीमुळे मुली किंवा महिला तातडीने किंवा वेळेवर सॅनिटरी नॅपकिन्स बदलत नाहीत. सॅनिटरी नॅपकिन्स कितीही चांगल्या दर्जाचे असले तरीही प्रत्येक पाच-सहा तासाने सॅनिटरी नॅपकिन बदलले गेले पहिजेत, अन्यथा अंतर्गत अवयवापर्यंत कित्येकदा संसर्ग होतो. हा संसर्ग वेळीच ओळखला नाही तर कित्येकदा मोठ्या कालांतरासाठीही उपचार घ्यावे लागतात.
डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता
‘द फेडरेशन ऑफ ऑब्स्ट्रेट्रीक एण्ड गायनोलोजिकल सोसायटी ऑफ इंडिया’ (फॉग्सी) या स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेच्या गर्भधारणेत होणा-या आजार समितीच्या अध्यक्षा डॉ. कोमल चव्हाण यांनी संसर्गावर वेळीच नियंत्रण मिळवणे गरजेचे असल्याच्या मुद्द्यावर लक्ष वेधले. अंतर्गत भागांत संसर्ग झाल्याने तब्बल ३५ टक्के महिला माझ्याकडे उपचार घेत असल्याचे सांगत ही समस्या वाढत असल्याने डॉ. चव्हाण यांनी महिलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली.
महत्त्वाचा सल्ला
शरीरात पोषक आहार नसेल तरीही अंतर्गत भाग आणि हळूहळू अंतर्गत अवयवापर्यंत संसर्ग होतो. अंतर्वस्त्रांना पांढरा, निळ्या रंगाचे द्रव्य आढळून आले की संसर्ग दिसू लागतो. या संसर्गाला दुर्गंधीही येते. त्यामुळे वेळीच स्त्रीरोगतज्ज्ञांकडे उपचार सुरु करण्याचा सल्ला डॉ. चव्हाण यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community